१९२४ सालच्या पुरात महात्मा गांधींनी केरळसाठी जमा केले होते ६ हजार रुपये

शतकातला सगळ्यात मोठ्या पुराचा फटका केरळला बसला आहे.

Updated: Aug 26, 2018, 06:36 PM IST
१९२४ सालच्या पुरात महात्मा गांधींनी केरळसाठी जमा केले होते ६ हजार रुपये title=

नवी दिल्ली : शतकातला सगळ्यात मोठ्या पुराचा फटका केरळला बसला आहे. या पुरामधून केरळची जनता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी १९२४ सालीही केरळमध्ये अशाच प्रकारचा भयावह पूर आला होता. त्यावेळी देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. केरळच्या मालाबार भागामध्ये १९२४ साली पूर आला होता. यावर्षीच्या पुरामध्ये २९० जणांनी जीव गमावला तर १० लाख नागरिक विस्थापित झाले. पण १९२४ सालच्या पुरामध्ये यापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी महात्मा गांधींनी केरळला मदत म्हणून देशभरातून ६ हजार रुपये जमा केले होते. १९२४ मध्ये ही रक्कम फार मोठी होती. 

१९२४ साली महात्मा गांधींनी त्यांचं वृत्तपत्र यंग इंडिया आणि नवजीवनमधून पुराच्या भयावह परिस्थितीबद्दल देशवासियांना माहिती दिली होती आणि केरळला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. 

महिलांनी दागिनेही दान केले

महात्मा गांधींच्या या आवाहनानंतर महिलांनी त्यांचे दागिनेही दान केले होते. तर काहींनी दान देण्यासाठी एक दिवस भोजनही केलं नाही. त्यावेळी नागरिकांनी घरातलं दूध विकूनही दानासाठी रक्कम गोळा केली होती. 

चोरलेल्या पैशांचंही दान 

एका मुलीनं चोरी केलेले ३ पैसेही दान केल्याचं महात्मा गांधींनी त्यांच्या नवजीवन या वृत्तपत्रातून सांगितलं. त्यावेली मालाबार परिसरातील लोकांचं आयुष्य उद्धवस्त झालं होतं. पण आवाहन केल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांनी मदत केल्याचं महात्मा गांधी म्हणाले होते. 

ग्रेट फ्लड ऑफ ९९ 

केरळच्या इतिहासामध्ये १९२४ च्या पुराला महापूर म्हणून संबोधलं जातं. या महापुराला अजूनही ग्रेट फ्लड ऑफ ९९ म्हणलं जातं. मल्याळम कॅलेंडरनुसार हा महापूर १०९९ साली आला होता, म्हणून त्याला ग्रेट फ्लड ऑफ ९९ म्हणलं जातं. त्यावेळी केरळ त्रावणकोर, कोच्ची आणि मलबार या तीन भागांमध्ये वाटला गेला होता.