कोलकाता : पश्चिम बंगालच्या सबांग मतदार संघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देत टीएमसी(तृणमूल कॉंग्रेस) ने शानदार विजय मिळवला आहे. टीएमसीच्या उमेदवार गीता राणी भुंइया यांचा इथे विजय झालाय.
या पोटनिवडणुकीत टीएमसी पहिल्या क्रमांकावर सीपीएम दुस-या तर भाजप तिस-या स्थानावर राहिली. टीएमसीने ६४ हजार १९२ मतं घेत विजय मिळवला. सीपीएमला ४१ हजार ९८७ मतं तर भाजपला ३७ हजार ४७६ मतं मिळवली. तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या कॉंग्रेसने १८ हजार ०६० मतं मिळवलीत. नोटाला १५३५ मतं मिळाली.
कॉंग्रेसचा गढ मानल्या जाणा-या सबांग जागेवर २१ डिसेंबरला पोटनिवडणुक घेण्यात आली. तृणमूल कॉंग्रेसने कॉंग्रेसचे माजी नेते मानस भुंइया यांच्या पत्नी गीता राणी भुंइया यांना मैदानात उतरवले होते. मानस भूंइया यांनी कॉंग्रेस सोडूण ममता यांच्या पक्षात प्रवेश केल्याने या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली.
मानस भुइंया यांनी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. त्यांना तृणमूलच्या सीटवर राज्यसभेसाठी निवडले गेले होते. त्यानंतर या जागेवर पोटनिवडणुक घेणे गरजेचे होते. भाजपकडू अंतरा भट्टाचार्य, कॉंग्रेसचे चिरंजीव भौमिक, सीपीआय(एम)च्या नेत्या रीता मंडल वाम मोर्चाकडून मैदानात होत्या.