Weather Updates : विजांच्या कडकडाटासह 'या' भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा

Weather Updates : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल, पाहा अचानंकच कुठे कोसळणार मान्सूनसारखा पाऊस. एका क्लिकवर पाहा हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: Jan 8, 2024, 06:55 AM IST
Weather Updates : विजांच्या कडकडाटासह 'या' भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा  title=
weather updates rain predictions in north maharashtra and south india know latest updates

Weather Updates : मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता दूर झालं असून, हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही याचे परिणाम दिसणार असून, वीजांच्या कडकडाटातच पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीय वारे निर्माण झाले आहेत. ज्यामुळं गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं मोठं क्षेत्र प्रभावित होताना दिसत आहे. गुजरातपासून उत्तर प्रदेशापर्यंत हा पट्टा विस्तारला असून, या भागांमध्ये वाऱ्याची स्थिती पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती करताना दिसत आहे. 

वाऱ्यांची एकंदर स्थिती पाहता नंदुरबार, धुळ्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कारण, इथं रक्त गोठवणाऱ्या थंडीचं सत्र अद्यापही सुरुच आहे. 

देशातही कुठे थंडीचा कडाका, तर कुठे पावसाचा तडाखा...

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशाच्या काही राज्यांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार असला तरीही काश्मीरचं खोरं, हिमाचलच्या आणि उत्तराखंडचं पर्वतीय क्षेत्र इथं मात्र थंडीका कहर सुरुच राहणार आहे. येत्या दोन दिवसांसाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये कमाल तापमान 14 अंशांच्या घरात राहील. तर, पर्वतीय क्षेत्रांवर हिमवृष्टीचा मारा सुरुच राहणार आहे. त्यातच धुक्याचं प्रमाण जास्त राहणार असून, त्यामुळं दृश्यमानता कमीच राहील. 

खासगी हवामान वृत्तसंस्था स्कायमेटच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये पावसाचे ढग पश्चिमेकडे पुढे सरकणार असून, काही राज्यांमध्ये यामुळं पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. (Uttarakhand, Himachal Pradesh) हिमाचल आणि उत्तराखंडमध्येसुद्धा पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडू शकते. पावसामुळं या भागांवर असणारी धुक्याची चादर मात्र विरणार असून, त्यामुळं दिवसा सूर्यप्रकाश आणखी प्रखर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं सकाळच्या वेळी बोचरी थंडी कमी त्रासदायक ठरेल. 

हेसुद्धा वाचा : Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

 

गेल्या 24 तासांमध्ये तामिळनाडूसह केरळातील काही भागांमध्ये हलका पाऊस झाला. पुढील 24 तासांमध्येही हा प्रभाव कायम राहणार असून तामिळनाडूच्या बहुतांश भागांना पाऊस झोडपणार आहे. केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिणेलाही पावसाचा मारा सोसावा लागणार आहे. गोवा, कोकण, लक्षद्वीप, राजस्थान, गुजरात, पश्चिम राजस्थानही या पावसाच्या विळख्यात येणार आहेत. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ऊन, वारा आणि पावसासह थंडीचा बंदोबस्तही करूनच निघा!