Weather Forecast: 6 ऑक्टोबरपासून या राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस!

देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो.

Updated: Oct 3, 2022, 06:27 AM IST
Weather Forecast: 6 ऑक्टोबरपासून या राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस! title=

दिल्ली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमधील वातावरण गार आहे. वातावरणात थोडा उष्मा आहे, पण संध्याकाळनंतर थोडीशी थंडीही जाणवतेय. याचं कारण म्हणजे यंदा मान्सूनने अजूनही निरोप घेतलेला नाही. आता हवामान खात्याने पुन्हा एकदा 6 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. दिल्ली-एनसीआर आणि उर्वरित देशातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.

6 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाळा सुरू 

हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 6 ऑक्टोबरपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो. पावसासोबत जोरदार वारेही वाहतील, त्यामुळे रात्रीसह दिवसाचं तापमानही कमी होऊन लोकांना थंडी जाणवेल. 

दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस 

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पाऊस सुमारे 3-4 दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर मान्सून हळूहळू निघून जाईल. हवामान तज्ज्ञांच्या मते, दिल्लीत सोमवारीही वातावरण आल्हाददायक राहणार आहे.

देशभरातून दरवर्षी 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून निघून जातो. परंतु यावेळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे देशाच्या विविध भागात अधूनमधून मान्सूनचा पाऊस पडतोय. मात्र, 11-12 ऑक्टोबरनंतर यंदाचा मान्सून परतेल, असंही मानलं जातंय.