पावसाळ्यातील एका अद्वितीय ठिकाणचं दृश्य शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणतात...

पाहा खऱ्याखुऱ्या अतुल्य भारताची झलक

Updated: Aug 26, 2020, 02:50 PM IST
पावसाळ्यातील एका अद्वितीय ठिकाणचं दृश्य शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणतात...  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच काही लक्षवेधी गोष्टी सर्वांच्या भेटीला आणत असतात. एखादी योजना असो किंवा मग आणखी काही रंजक बाब असो. प्रत्येक वेळी पंतप्रधानांनी साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. यावेळीसुद्धा त्यांनी असंच एक ट्विच केल्याचं पाहायला मिळत आहे. 

विविधतेनं नटलेल्या भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत जी खऱ्या अर्थानं देशाचं वेगळेपण सिद्ध करतात. अशाच ठिकाणांपैकी एक असणाऱ्या स्थळाची एक झलक मोदींनी शेअर केली आहे. निसर्गाची किमया म्हणा किंवा मग आणखी काही, हे ठिकाण खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरत आहे. 

मोदींनी शेअर केलेला हा व्हिडिओ आहे, गुजरात येथील मोदेरा या ठिकाणी असणाऱ्या सूर्य मंदिराचा. पावसाळ्यात हे ठिकाण अद्वितीय असतं... असं कॅप्शन लिहित अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या पायऱ्यांवरुन पाणी वाहताना दिसत आहे. 

 

मंदिराची रचना आणि त्याला निसर्गाच्या किमयेची मिळालेली जोड पाहता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाऊन हे दृश्य प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली. तर, काहींनी पंतप्रधानांचा हा व्हिडिओ रिट्विट करत आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देत कुतूहल व्यक्त केलं. गुजरात टुरिझमच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सूर्य मंदिर हे पुष्पावती नदीच्या किनारी मोधेरा येथे हे मंदिर आहे. सोलंकी शासकांच्या काळातील हे मंदिर असल्याचं सांगण्यात येतं.