मुंबई : मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी विविध मार्गांनी मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न फक्त निवडणुक आयोग आणि विविध पक्षांच्या उमेदवारांकडूनच केले जात आहेत, असं नाही. तर या मोहिमेत आता शालेय विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मतदारांनी पुढे येत या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा यासाठी Mount Litera School International च्या विद्यार्थांनी एक हटके रॅप केला आहे.
वोट दो असे या रॅप साँगचे बोल असून, त्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी सजग मतदारांना पुढे येण्याचं आवाहन केलं. देशाचं भवितव्य असणारे हेच विद्यार्थी पुढे जाऊन सुजाण नागरिक होणार आहेत. त्यामुळे आता जरी त्यांना मतदानाचा अधिकार नसला तरीही याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भवितव्यासाठी सध्याच्या घडीला ज्यांना अधिकार आहे, त्या सर्व मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याची विनंती केली आहे.
विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न पाहता सोशल मीडियावर त्यांच्या या रॅप साँगची बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे विविध मार्गांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न केले गेल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येवर प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आता या साऱ्या प्रययत्नांचं फळ आणि निवडणुकांचा निकाल नेमका कसा असणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.