सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव

Sabarimala : कुमुली टेकडीवर हा अपघात झाला असून सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच गाडीला अपघात झाला आणि ती दरीत कोसळली

Updated: Dec 24, 2022, 01:22 PM IST
सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव title=

Sabarimala Accident : केरळ - तमिळनाडू सीमेवर शुक्रवारी झालेल्या कारच्या भीषण अपघतात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कुमिलीजवळ सबरीमालावरुन यात्रेकरूंना घेऊन जाणारी कार 40 फूट दरीत कोसळल्याने आठ यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. सर्व यात्रेकरू मूळचे थेनी-अँडीपेट्टीचे रहिवासी होते आणि ते सबरीमालावरुन परतत होते.

सात जणांचा जागीच मृत्यू 

थेनीचे जिल्हाधिकारी केव्ही मुरलीधरन यांनी अपघाताची माहिती दिली आहे. कुमुली टेकडीवर हा अपघात झाला. सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी केव्ही मुरलीधरन यांनी दिली.

अय्यपाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

सबरीमाला येथे सध्या श्री धर्म संस्था मंदिरात भगवान अय्यप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. दिवसाला सुमारे 1 लाख लोक दर्शनासाठी येत असल्याची माहिती संस्थानाने दिली आहे. केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, नुकत्याच केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी भागात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 38 जण जखमी झाले आहेत. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला दुसऱ्या बसने पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर बस दलदलीत कोसळली. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले.