व्हिडिओ : मरणासन्न वानराला त्यानं दिला तोंडानं श्वास पण...

एक 'भावनिक' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय

Updated: Jul 24, 2018, 11:53 AM IST

भोपाळ : 'माणुसकी'लाही लाजवेल असा माकडाचा एक 'भावनिक' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. मध्यप्रदेशच्या खरगौन जिल्ह्यातील बलवाडी गावातील हा व्हिडिओ आहे. आपल्या मित्रांच्या झुंडीत जात असलेल्या एका वानराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला... आणि तो जमिनीवर कोसळला. झुंडीतील इतर वानरांनी हे दृश्य पाहिलं... आणि तत्काळ ते या वानराच्या मदतीसाठी धावले. 

एक वानर खाली आलं आणि जखमी झालेल्या वानराच्या मदतीचा प्रयत्न करू लागलं. मरणासन्न अवस्थेत पोहचलेल्या या वानराला हलवून ते शुद्धीत आणण्याचं प्रयत्न करू लागलं... तोंडानं श्वास देण्याचाही त्यानं प्रयत्न केला... त्याचाही परिणाम झाला नाही तेव्हा या वानरानं छातीवर चढून जखमी वानराचं हृदय सुरू ठेवण्याचाही प्रयत्न केला. 

जवळपास तासभर वानरांची ही कसरत सुरू होती. परंतु, तरीही जखमी वानर काही हालचाल करेना... त्यामुळे, इतर वानरांनी त्याला तिथं सोडून जड मनानं बाजूच्या झाडावर जाऊन त्याला पाहू लागले... आपल्या साथीदारानं सोडून जाण्याचं दु:ख ते व्यक्त करू शकत नसले तरी उपस्थितांना त्याची जाणीव होत होती. 

त्यानंतर गावातील काही रहिवाशांनी एकत्र येत मृत वानराची अंत्ययात्रा काढली आणि त्याला जवळच दफन केलं गेलं.