Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएममध्ये खळबळ सुरूच आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 27, 2024, 11:21 AM IST
Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस? title=
Vijay Shekhar steps down as Paytm Payments Bank chairman who will become the new chairman

Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा भविष्यातील व्यवहार नव्याने स्थापन झालेल्या मंडळद्वारे पाहिला जाणार आहे. 

पेटीएमने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, PPBL ने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास श्रीधर, सेवानिवृत्त IAS अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि माजी IAS अधिकारी रजनी सेखरी सिब्बल यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वजण नुकतेच संचालक म्हणून रुजू झाल्याची माहिती समोर येतेय. 

पीटीएमच्या नव्या संचालकाचे नाव मात्र अद्याप घोषित केलेले नाहीये. आता पीटीएम पेमेंट्स बँक लवकरच नव्या अध्यक्षांना नियुक्त करणार आहे. सध्या विजय शेखर शर्मा यांच्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेची 51 टक्के भागीदारी आहे. तर, वन97 कम्युनिकेशनकडे उर्वरित शेअर आहेत. एका रिपोर्टनुसार, सोमवारी पेटीएमच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी उसळी घेतली होती. बँकिंग क्षेत्रात 39 वर्षांचा अनुभव असलेल्या नव्या मंडळाचे सदस्य अशोक कुमार गर्ग यांनी यापूर्वी न्यूयॉर्कमधील बँक ऑफ बडोदाच्या यूएस ऑपरेशन्सचे नेतृत्व केले होते. ते युगांडातील बँक ऑफ बडोदाचे एमडी होते. सारंगी हे पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आणि व्होल्टासच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून काम करतात.

पेटीएमचा शेअर 

26 फेब्रुवारी रोजी सोमवारी पेटीएम शेअरची किंमत 5 टक्के अप्पर सर्किटवर आली होती. तर, पेटीएमने गेल्या सात ट्रेडिंग सत्रात सहा वेळा अप्पर सर्किट धडक दिली होती. तर, पेटीएमचे शेअर सोमवारी बीएसईवर 5 टक्के वाढून 427.95 रुपयांवर बंद झाले होते. 

पेटीएमवर कारवाई का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे पालन न केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर कारवाई केली होती. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला 1 मार्चनंतर ग्राहकांकडून कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारण्यास किंवा टॉप अप घेण्यास बंदी घातली होती.