व्हिडिओ : अनंतनागमध्ये 'ईद'च्या दिवशी सुरक्षा दलावर जीवघेणा हल्ला

या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय 

Updated: Aug 22, 2018, 12:39 PM IST
व्हिडिओ : अनंतनागमध्ये 'ईद'च्या दिवशी सुरक्षा दलावर जीवघेणा हल्ला  title=

जम्मू : आज 'बकरी ईद'च्या निमित्तानं देशातील अनेक मस्जिदमध्ये शांतीसाठी प्रार्थना केली जातेय. अनेकांच्या तोंडी शांतीचा संदेश आहे. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये मात्र सुरक्षा दलावरच दगडफेक करून हल्ला केल्याची घटना समोर येतेय. ईदच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सकाळी-सकाळी सुरक्षा दलावर लोकांनी तुफान दगडफेक केली. 

न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाची गाडी जिल्ह्यातील एका हॉस्पीटलच्या बाजूनं जात असताना लोकांच्या एका गटानं सुरक्षा दलावर दगडफेक सुरू केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या लोकांमधला सुरक्षा दलावरचा राग स्पष्टपणे दिसून येतोय. काही कॅमेऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांना फोटोंमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला असता ते तोंड लपवून पसार होताना दिसले. 

सेनेच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या या टोळक्यांच्या हातात ISIS चे झेंडेही दिसून आले.... हे सर्व लोक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. त्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराचा वापर केला. 

ईदच्या निमित्तानं जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेवर इस्लामिक स्कॉलर, रिझवान अहमद यांनी 'दगडफेक करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो... ते केवळ धर्माच्या नावावर झुंडीला चेतावण्याचा प्रयत्न करतात' असं म्हटलंय.