नियम तोडले तर दंड नाही, गाडीच होणार जप्त

नियमांना धुडकावून लावणाऱ्या गाड्यांना यामुळे चाप बसणार आहे. 

Updated: Apr 12, 2018, 06:36 PM IST
नियम तोडले तर दंड नाही, गाडीच होणार जप्त  title=

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम तोडून तुम्ही दंड भरून सहजासहजी सुटू शकता, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला यापुढे अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड लावला जाणार नाही तर सरळ सरळ त्यांची गाडीच परिवहन विभागाकडून जप्त केली जाणार आहे. तसे आदेशच दिल्ली परिवन विभागानं दिले आहेत. यामुळे, दिल्लीत परमिट नियमांना धुडकावून लावणाऱ्या गाड्यांना चाप बसणार आहे. 

अनेकदा दंड भरूनही वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या गाड्या आता जप्त केल्या जात आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत जप्त केल्या गेलेल्या गाड्यांची संख्या जास्त असल्याचं गेल्या तीन महिन्यांचे आकडे सांगत आहेत. 

2017 मध्ये पहिल्या तीन महिन्यांत 4 ते 5 हजार गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. तर या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची एकूण संख्या आहे - 12216. याशिवाय एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एकूण 1381 गाड्या जप्त केलेल्या आहेत.

परमिटशिवाय चालणाऱ्या अनेक अवैध गाड्या रस्त्यांवर दिसत असल्यानं परिवहन विभागानं या गाड्या जप्त करण्याचे आदेश दिल्याचं, अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या गाड्यांचं परमिट रद्द करण्याची सिफारसही करण्यात आलीय. दिल्लीत मार्चपर्यंत यूपीच्या 210 बस, राजस्थानच्या 534 बस, दिल्लीच्या 46 आणि इतर राज्यांच्या 41 बस जप्त करण्यात आल्या आहेत. 
खाजगी गाड्यांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करणाऱ्या 327 गाड्यांवरदेखील कारवाई करण्यात आलीय. याशिवाय 1379 थ्रीव्हिलरही जप्त करण्यात आल्यात. तर 15 दुचाकी गाड्यांवरही कारवाई करण्यात आलीय.