नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी स्टारर 'छपाक' १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि नंतरही चित्रपटबाबत वाद सुरु आहेत. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर उत्तराखंड सरकारने महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. दीपिकाच्या 'छपाक'ने प्रेरित होत उत्तराखंड सरकारने ऍसिड अटॅक पीडितांसाठी पेन्शन योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.
महिला आणि बाल कल्याण मंत्री रेखा आर्य यांनी, ऍसिड अटॅक पीडितांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी पेन्शनद्वारे त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
PURPOSE. pic.twitter.com/7qdqymymWz
— Meghna Gulzar (@meghnagulzar) January 12, 2020
उत्तराखंडमध्ये जवळपास १० ते ११ ऍसिड अटॅक पीडिता आहेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पीडितांना प्रत्येक महिन्याला ५ ते ६ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. मंत्री रेखा आर्य यांनी याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचंही सांगितलं.
सत्य घटनेवर आधारित 'छपाक'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेचंही कौतुक होतं आहे. 'छपाक'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४. ७७ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने ६.९० कोटींचा आकडा गाठला. दोन दिवसांत 'छपाक'ने जवळपास ११.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक'मध्ये दीपिकाशिवाय विक्रांत मेसी, मधुरजीत आणि अंकित बिष्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.