Crime News : नैराश्यातून एका कबड्डी प्रशिक्षकाने टोकाचं पाऊल उचलल्याची (Kabaddi Coach Suicide) धक्कादायक घटना समोर आली आहे. राहात्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एका गाण्यावर रिल (Reel) बनवला. तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला. कबड्डी प्रशिकाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.
नेमकी घटना काय?
विक्रांत उपाध्याय (Vikrant Upadhay) असं त्यांचं नाव होतं, ते अवघ्या 25 वर्षांचे होते. उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधल्या (UP Kanpur) पनकी परिसरातील गणेश शंकर विद्यार्थी नगरमध्ये ते राहात होते. कानपूरमधल्याच अर्मापूर मैदानावर ते मुलांना कबड्डीचं प्रशिक्षण द्यायचे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार घरात कोणतीच समस्या नव्हती, शिवाय त्यांचे कबड्डीचे प्रशिक्षण वर्गही चांगले सुरु होते. त्यामुळे विक्रांत उपाध्याय यांनी आत्महत्या का केली याचं गुढ कायम आहे.
आत्महत्येपूर्वी विक्रांत उपाध्याय यांनी एक व्हिडिओ बनवला. 'जीत की हवस नहीं किसी पे कोई बस नहीं क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो, मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरें...' या गाण्यावर रील बनवत त्यांनी तो रिल सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना विक्रांत उपाध्याय यांच्या मृतदेहाच्या बाजूला कोणताही सुसाईड नोट मिळाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून विक्रांत उपाध्याय यांच्या कुटुंबाचीही चौकशी केली जात आहे.
आश्रमासमोर तरुणाची आत्महत्या
कानपूरमध्ये तरुणाच्या आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. हा तरुण पश्चिम बंगालमधून आपल्या आई आणि बहिणाच्या उपचारासाठी करौली आश्रमात घेऊन आला होता. अजय चौहान असं मृत तरुणाचं नाव होतं. आई आणि बहिणीच्या आजारापणामुळे अजय नैराश्यात होता. यातूनच त्याने करौली आश्रमाजवळ असलेल्या एका झाडाला गळफास लावत आत्महत्या केली. अजयच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अजयही गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. यामुळे त्याची मानसिक परिस्थिती बिघडली होती. अनेकवेळा तो जेवायचा नाही. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.