UPSC 2023 Results Topper Aditya Srivastava: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससीतर्फे) 2023 साली घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक अनिमेष प्रधानने पटकावला तर दोनुरु अनन्या रेड्डीने देशातून तिसरा आला आहे. मंगळवारी हे निकाल जाहीर झाले. या परीक्षेसाठी तयारी करण्याआधी देशातून पहिला आलेला आदित्य 'गोल्डमन गोल्डमन सॅक्स'मध्ये कॉर्परेट जॉब करायचा. अमेरिकेतील सुप्रसिद्ध वित्तसंस्था असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’च्या बंगळुरुमधील कार्यालयात नोकरी करताना आदित्यला मासिक पगार 2.5 लाख रुपये होता. मात्र ही नोकरी सोडून आदित्यने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
युट्यूबवर 'राऊज आयएएस अकादमी'ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या आदित्याने एवढ्या पगाराची नोकरी का सोडली यासंदर्भात खुलासा केला आहे. आदित्याच्या मुलाखतीदरम्यान मुलाखतकार त्याला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडण्यासंदर्भात प्रश्न विचारताना दिसतो. "‘गोल्डमन सॅक्स’मधील नोकरी आणि तू काम करत असलेलं क्षेत्र सोडून इथे काम करण्याची इच्छा कशी झाली?" असा प्रश्न आदित्यला विचारण्यात येतो.
यावर आदित्य, "सर, यासाठी 2 महत्त्वाची कारणं आहे. मी ज्या प्रदेशातून आलो हे ते पाहिल्यास आमच्या इथे आशिर्वाद देतानाही कलेक्टर हो वगैरे असा देतात. त्यामुळे त्या भागातून आल्याने मला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगातील नोकऱ्यासंदर्भातील कल्पना होती. मात्र मी नोकरी करत असताना यासंदर्भात गांभीर्याने विचार करुन निर्णय घेतला. थोडा विचार केल्यानंतर मला असं उमगलं की केवळ मुलांनाची पोटं भरुन, त्यांना जेवायला देऊन लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करता येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हा निर्णय घेण्यामागे सामाजिक प्रतिष्ठा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता," असं उत्तर दिलं.
सामाजिक प्रतिष्ठा हवी होती तर तुला ‘गोल्डमन सॅक्स’मध्येही वरच्या पदावर काम करुन आणि अमेरिकेला शिफ्ट होऊन ती मिळवता आली असती, असं मुलाखतकार विचारतो. यावर आदित्यने सामाजात मिळणारी प्रतिष्ठा मला अधिक महत्त्वाची वाटते, असं सांगितलं. "कोणालाही ‘गोल्डमन सॅक्स’मध्ये काम करणारे कोण आहेत हे लक्षात राहत नाही. मात्र प्रत्येकाला टी. एन. शेषन कोण आहेत हे ठाऊक आहे," असं आदित्य म्हणाला.
तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन म्हणजेच टी. एन. शेषन हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी निवडणूक प्रतिक्रियेमध्ये अमुलाग्र बदल घडवले. शेषन यांची 12 डिसेंबर 1990 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. 11 डिसेंबर 1996 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. केरळमधील पल्लकड जिल्ह्यात जन्मलेल्या शेषन यांनी निवडणुकांचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या सुधारणा केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त पदावरील नियुक्तीआधी त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे सचिव आणि अंतराळ विभागाचे सहसचिव पद सांभाळले होते.