उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करुन चक्क दहा हजारांहून अधिक बनावट मतदार ओळखपत्र बनवली. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमधली ही घटना असून कॉम्प्युटर शॉप चालवणाऱ्या या तरुणाने तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट मतदार ओळखपत्र बनवण्याचा सपाटाच लावला होता. विपुल सैनी असं या तरुणाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये विपुल सैनीनं हजारो बनावट ओळखपत्र बनवली आहेत. मात्र, या ओळखपत्रांचा वापर तो कोणत्याही राजकीय कारणासाठी करत नव्हता तर केवळ पैसे कमवण्याच्या हेतूने त्याने ही ओळखपत्र बनवल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. विपुल सैनीच्या बँक खात्यात तब्बल 60 लाख रुपये जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन आठवड्यांपूर्वी, विभागातील उच्च अधिकाऱ्यांना आयोगाच्या वेबसाईटवर काही तांत्रिक गडबड झाल्याचा संशय आला. त्यानंतर ही माहिती त्यांनी आयटी विभागाला दिली. आयटी विभागाने तात्काळ सक्रीय होत याचे धागेदोरे शोधून काढले. सहारनपूरच्या नकुड भागातून हा प्रकार होत असल्याचं समोर आलं. याबाबतची माहिती त्यांनी सहारनपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिली. त्यानंतर आयोगाचे आयटी सेल अधिकारी आणि जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकून विपुल सैनीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लॉग-इन करत होता. त्याच्या दुकानावर टाकलेल्या छाप्यातून पोलिसांनी एक हार्ड डिस्क आणि कम्प्युटर देखील जप्त केली आहे. विपुल सैनीनं नुकतंच यूपीमधील एका विद्यापीठातून बॅचलर्स ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन पूर्ण केलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार विपुल सैनी गेल्या तीन महिन्यांपासून बनावट मतदार ओळखपत्र बनवता होता. प्रत्येक ओळखपत्रामागे त्याला 100 ते 300 रुपये मिळत होते. मध्यप्रदेशच्या हरदा इथं राहणाऱ्या अरमान मलिक नावाच्या वक्तीच्या सांगण्यावरुन बनावट ओळखपत्र बनवत असल्याची माहिती विपुल सैनीने पोलिसांनी दिली. पोलीस अरमान मलिकचा शोध घेत असून किती जणांनी बनावट ओळखपत्र विकत घेतली आहेत याचाही शोध घेतला जात आहे.