2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण...

Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2024, 03:54 PM IST
2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण... title=
उत्तर प्रदेशमध्ये घडला हा प्रकार (प्रातिनिधिक फोटो)

Letter To SDM For Permission Abusing On Speaker: सरकारी काम, काही महिने थांब असं सामान्यपणे सरकारी कामांमधील दिरंगाईबद्दल सहज बोलताना अनेकदा कानावर पडतं. सरकारदरबारी काही काम असलं किंवा काही अर्ज करायचा असेल तर किती वेळ वाट पहावी लागेल सांगता येत नाही. विशेष म्हणजे असे अर्ज किंवा काम होईल की नाही याचीही शाश्वती नसते. पण अशा परिस्थितीमध्येही काहीजण अगदी वाट वाकडीकडून या सिस्टीमच्या नादी लागतात आणि चर्चेचा विषय ठरतात. असाच काहीसा प्रकार सध्या उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथून एक थक्क करणारी बातमी समोर येत आहे. प्रतापगडमधील एका नागरिकाने 2 तासांसाठी एका वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर शिव्या देण्याची परवानगी आपल्याला द्यावी अशी मागणी केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

एका वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेल्या लेखामुळे या पीडित व्यक्तीवर जमीन हडपण्याचा आरोप लावण्यात आला. त्यामुळे ही व्यक्ती कमालीची संतापली. तिने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगताना उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट माईक लावून हे वृत्त छापणाऱ्यांना शिव्या देण्याची परवानगी मागितली. उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव प्रतीक सिन्हा असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला माईक घेऊन एका वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर 2 तास शिव्या देण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी केली आहे. या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेल्या लेखानंतर हा अर्ज करण्यात आला आहे. या पीडित व्यक्तीला लेखामध्ये जमीन माफिया असल्याचं लिहिलेलं आहे. या वृत्तपत्राला मानहानीची नोटीस या व्यक्तीने पाठवली आहे. मात्र त्यानंतरही या व्यक्तीने थेट उप-जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून माईकवरुन शिव्या देण्याची आपण उत्सुक असून परवानगी द्यावी, असं म्हटलं आहे.

प्रतिमा मलिन करण्याचा आरोप

अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये या व्यक्तीने, 9 जानेवारी रोजी 'कोणत्याही कारणाशिवाय त्याच्या जमीनीवर बुल्डोझरने कारवाई करण्यात आली.' पत्रानुसार त्यानंतर या व्यक्तीला वृत्तपत्राने 'माफिया' असं म्हटलं. वृत्तपत्राने केलेल्या आरोपांचे पुरावे उपलब्ध नसल्याचा दावा करतानाच या लेखामुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.

2 तास शिव्या देण्याची परवानगी

"या लेखाविरोधात मी 15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ब्यूरो प्रमुख आणि रिपोर्टरला 2 तास शिव्या देण्याची परवानगी मागत आहे," असा पत्रात म्हटलं आहे. आता या पत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसत आहे.