नवी दिल्ली : ब्ल्यु व्हेलचा धोका अद्यापही कायम असल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने ब्ल्यु व्हेलच्या नादात आत्महत्या केली आली आहे. या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपला जीव संपवला.
दरम्यान, या मुलाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? पोलीस याबाबत तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमीरपूर येथील मौहदा परिसरातील मराठीपुरा येथे विक्रम सिंह आपल्या कुटुंबासोबत राहतात. विक्रम सिंह यांना पार्थ (वय १३ वर्षे) नावाचा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता सातवीत शिकत होता. रविवारी संध्याकाळी वडीलांच्या मोबाईलवर तो ब्लु व्हेल गेम खेळत होता. अचानकपणे तो आपल्या खोलीत आला आणि खुर्चीवर उभे राहून त्याने घरातील पंख्याला गळफास घेतला.
बराच वेळ पार्थ खोलीबाहेर आला नाही, त्यामुळे घरातल्यांनी आवाज दिला तर त्याच्या खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे वडिलांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला. तर, समोर पार्थचे शरीर पंख्याला लटकत होते. विक्रम सिंह यांनी सांगितले की, तो मोबाईलवर सतत गेम खेळत असे. आम्ही त्याला अनेकदा टोकले होते. तसेच, अनेकदा ओरडलोही होतो. मात्र, त्याची सवय कायम होती. जेव्हा आम्ही आमचा विरोध तीव्र केला तेव्हा तो चोरून गेम खेळू लागला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी त्याला मित्राच्या बर्थडे पार्टीला जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली, अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी दिली आहे.