"मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या..."; तरुणीने संपवलं जीवन

तरुणीच्या भावाने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक

Updated: Oct 6, 2022, 05:14 PM IST
"मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या...";  तरुणीने संपवलं जीवन title=
(फोटो सौजन्य - reuters)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथे एका 27 वर्षीय तरुणीने जिम (gym) ऑपरेटरच्या भावाच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट (suicide note) लिहून ठेवली होती. यामध्ये जिम (gym) चालकाच्या भावाला मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण आग्रा (Agra) येथील असल्याचे समोर आलं आहे. (UP agra girl end his life says gym biggest mistake)

मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, तो सोमवारी बाहेरगावी गेला होता. लहान बहीण घरात एकटीच होती. दुपारी तो घरी परतला तेव्हा बहीण दरवाजाच्या वरच्या लोखंडी जाळीला ओढणीपासून बनवलेल्या फासावर लटकत होती. तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत मुलीच्या सुसाईड नोटमध्ये तिने आधी पालकांची माफी मागितली आहे. त्यानंतर जिमला जाणे ही तिची सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले. सुसाईड नोटमध्ये मुलीने आपल्या मृत्यूसाठी जिम चालकाचा भाऊ अंकित शर्माला जबाबदार धरले आहे. या चिठ्ठीत मुलीने प्रेमात फसवणूक झाल्याचे लिहिले आहे. यामुळे नाराज होऊन तिने आत्महत्येचे पाऊल उचलले, सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या भावाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे.

मुलीने सुसाईड नोटमध्ये आपली व्यथा मांडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मला माफ कर आई, आता मला जगायचे नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे जिमला जाणे. बाहेर लोक कसे आहेत हे मला माहीत नव्हते. मी अंकित शर्माच्या प्रेमात पडले. सुरुवातीला माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं. माझा नंबर मिळाल्यानंतर त्याने मला मेसेज केला. सकाळ संध्याकाळ मेसेज येऊ लागले. हळू हळू प्रेमात पडले, असे मृत मुलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अंकित पोलिसांच्या ताब्यात आहे. पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल तसेच मुलीच हस्ताक्षर तपासण्यासाठी सुसाईड नोट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.