उन्नाव 'रेप कॅपिटल' : एका वर्षात ८६ बलात्कार, १८५ लैंगिक अत्याचार

उन्नाव प्रथमच चर्चेत आले ते भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका १७ वर्षीय तरुणीनं केलेल्या आरोपांमुळे. 

Updated: Dec 7, 2019, 03:52 PM IST
उन्नाव 'रेप कॅपिटल' : एका वर्षात ८६ बलात्कार, १८५ लैंगिक अत्याचार title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ६३ किलोमीटर अंतरावर असलेले उन्नाव. या जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. उन्नाव प्रथमच चर्चेत आले ते भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका १७ वर्षीय तरुणीनं केलेल्या आरोपांमुळे. ४ जून २०१७ रोजी सेंगर यांच्या बंगल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात. तरुणीला आणि वकिलाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न झाला.

पीडितेनं योगी आदित्यनाथ यांच्या घराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या सीबीआयच्या अखत्यारित आहे. अत्याचारांची ही मालिका सुरूच आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झालीये आणि लैंगिक अत्याचाराची १८५ प्रकरणं घडली आहेत. शुक्रवारी दिल्लीमध्ये दुसऱ्या एका प्रकरणातील  पीडितेच्या मृत्यूपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपले आहे. हा मृत्यू नैसर्गिक नाही. तिला आरोपींनीच जाळून मारलंय... या अत्यंत संतापजनक घटनेमुळे सार्वत्रित संतापाची भावना आहे. काँग्रेसने लखनऊमध्ये निदर्शनं करून योगी सरकारचा निषेध केला आहे. 

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेट दिली. सेंगर यांच्या प्रकरणात पीडितेला मारण्याचा प्रयत्न झाला असताना या प्रकरणील तरुणीला पोलिसांनी संरक्षण का दिलं नाही, असा सवाल त्यांनी केलाय. आरोपींचे भाजपशी लागेबांधे असल्यामुळेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची फास्ट ट्रॅक चौकशी करण्याचं आश्वासन दिले आहे. सेंगर आणि या ताज्या प्रकरणामुळे उन्नाव चर्चेत आले. पण ही केवळ २ प्रकरणं नाहीत. गेल्या वर्षभरात तब्बल ८६ बलात्कार नोंदवले गेलेत. ज्या तरुणी तक्रारीसाठी पुढे आलेल्या नाहीत, अशी कितीतरी प्रकरणं असण्याची शक्यता आहे. रामराज्याची भाषा करणाऱ्या सरकारला हे शोभणारे नाही, अशी चर्चा आहे.