Union Minister Wife Dies of Dengue: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या जुआल ओराम यांच्या पत्नीचं निधान झालं आहे. जहिंगिया ओराम यांचं भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबातील सदस्यांनी जहिंगिया यांच्या मृत्यूच्या वृत्ताला रविवारी दुजोरा दिला आहे. जहिंगिया ओराम या 58 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी जहिंगिया ओराम यांनी अखेरचा श्वास घेतला.
जहिंगिया ओराम यांचे पती आणि केंद्रीय आदिवासी कारभार मंत्रालयाचे मंत्री असलेले जुआल ओराम यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला असून त्यांच्यावरही याच रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याची माहिती समोर आली आहे.
जहिंगिया ओराम यांच्या मृत्यूनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी शोक व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री उशीरा मोहन चरण मांझी यांनी रुग्णालयामध्ये जाऊन ओराम कुटुंबियांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबरच ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरीचंदन, आरोग्य मंत्री मुकेश महालिंग, ओडिशा विधानसभेच्या अध्यक्ष सुरमा पाध्ये आणि भाजपाच्या इतर नेत्यांनाही जहिंगिया ओराम यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री माझी यांनी जहिंगिया ओराम यांच्या आठवणींना उजाळा देताना, त्या फार मृदू स्वभावाच्या आणि मितभाषी होत्या. जहिंगिया ओराम यांनी स्वत:ला समाजसेवा आणि चॅरिटेबल कामांमध्ये गुंतवून घेतलं होतं, असं म्हटलं. "जुआल ओराम यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासामध्ये जहिंगिया यांनी फार महत्त्वाची भूमिका पार पाडली," असंही मुख्यमंत्री म्हणाले. जहिंगिया आणि जुआल यांचं 8 मार्च 1987 रोजी लग्न झालं होतं. सुंदरगढ जिल्ह्यात असलेल्या जहिंगिया यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
डेंग्यू हा आजार डासांमार्फत पसरतो. डेंग्यू या आजारालाच डेंगी अथवा डेंग्यूचा ताप असे म्हणतात. डेंग्यूचा संसर्ग ज्या व्हायरसच्या माध्यमातून होतो तो व्हायरस एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमार्फत पसरतो. डेंग्यू झालेल्या रुग्णाला चावलेला डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला सुद्धा डेंग्यूची लागण होते. डेंग्यूचा संसर्ग झाल्यास रक्तातील प्लेटलेट्स (रक्त गोठवण्यात मदत करणात मुख्य भूमिका बजावणारा घटक) कमी होतात. डेंग्यूचा ताप गेल्यानंतर प्लेटलेट्स कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे ताप उतरल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी या पेशी पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. प्लेटलेट्स कमी होण्यासारख्या गंभीर लक्षणाबरोबरच रक्तदाब कमी होणे, हात-पाय थंड पडणे, कमी प्रमाणात लघवी होणे तसेच पोटात दुखणे अशी लक्षणं दिसून येतात. पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा फैलाव अधिक वेगाने होतो.