नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात पंधरा डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. यावर बोलताना डॉ. भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही, अशावेळी लहान मुलांबबात अधिक काळजी घ्यावी लागेल, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
एकीकडे आपण आदेश देतोय की सतर्क राहा, काळजी घ्या, नियमांचं पालन करा, पण त्याचबरोबर काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीत असं नमुद करण्यात आलं आहे की जिथे 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे अशा जिल्ह्यात जास्त काळजी घ्यायला हवी, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा, कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने पसरणारा आहे, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राच्या नियमावलीनुसार विचार करावा असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
लोकांनी गर्दी करु नये
ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या जल्लोषासाठी लोकांनी गर्दी करु नये असं आवाहनही डॉ. भारती पवार यांनी केलं आहे. खासगी पार्ट्यांवर बंधणं घालणं गरजेचं आहे, राज्याने कडक पावलं उचलावीत, नव्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.