केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज मतदारसंघातील खासदार कौशल किशोर यांच्या निवासस्थानी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी तरुणाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून, विनय श्रीवास्तव असं तरुणाचं नाव आहे. विनय श्रीवास्तव हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा मित्र होता. विनय श्रीवास्तव त्यांच्यासह तिथेच वास्तव्यास होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते पोलिसांनी घटनास्थळावरुन सरकारी परवाना असणारी पिस्तूल जप्त केली आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बेगरिया गावातील निवासस्थानी ही घटना घडली. येथेच विनय श्रीवास्तव याची गोळी घालून हत्या करण्यात आली. घटनास्थळी डीसीपी राहुल राज, एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, नातेवाईकांनी हत्येचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कौशल किशोर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मला घटनेची माहिती मिळाली आहे. पोलीस आयुक्तांना फोन करुन यासंबंधी सांगण्यात आलं. पोलीस तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासह आहोत. पोलीस आपलं काम करतील. माझा मुलगा घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. पिस्तूल सापडली असून, जप्त करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत.
याआधी 2021 मध्ये भाजपा खासदार कौशल किशोर यांची सून अंकिताच्या वडिलांनी आरोप केला होता की, त्यांच्या मुलीचं खासदाराने कोर्टातून अपहरण केलं होतं. पण कौशल किशोर यांनी सर्व आरोप खोटे आहेत सांगत अंकिता आपला मुलगा आयुषसह आनंदाने राहत असल्याची माहिती दिली होती. सूनेचे वडील आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटे आरोप केले आहेत असा दावा त्यांनी केला होता.
याआधी कौशल किशोर यांचा मुलगा आयुषही वादात अडकला होता. आपल्यावर गोळी झाडून घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता. पोलीस तपासात समोर आलं होतं की, एका व्यक्तीला अडकवण्यासाठी आयुषने आपल्या मेहुण्याकडून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.