Union Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?

Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 23, 2024, 08:55 AM IST
Union Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात? title=
हा वेळ का बदलण्यात आला?

Why Union Budget Is Presented At 11 AM: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा भारताचा 93 वा अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प ठरणार आहे. (येथे क्लिक करुन पाहा Budget 2024 संदर्भातील सर्व Live Updatesसलग सात वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाातील पहिल्याच अर्थमंत्री ठरणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. म्हणजेच लोकसभा निवडणूक होईपर्यंत आणि नव्याने सरकार सत्तेत येईपर्यंत देशाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी मांडलेला तत्पुरत्या स्वरुपाचा अर्थसंकल्प. मात्र तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आज मोदींच्या तिसऱ्या टर्मचा पहिलाच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं असतानाच निर्मला सीतारामण ठीक 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेमध्ये उभ्या राहतील. मागील काही वर्षांमध्ये भारतीय अर्थसंकल्प हा सकाळी 11 वाजताच सादर केला जातो. पूर्वी ही वेळ सायंकाळी 5 वाजताची होती. मात्र या वेळेमध्ये बदल का करण्यात आला? ही वेळ आधी 5 ची होती मग ती सकाळी 11 ची का करण्यात आली जाणून घेऊयात रंजक इतिहास...

...म्हणून सांयकाळी 5 वाजता सादर व्हायचा अर्थसंकल्प

भारत ब्रिटीश राजवटीखाली असताना भारताचा अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता मांडला जायचा. यामागील मूळ कारण होतं त्यावेळेची राज्यकर्ते हे ब्रिटनमध्ये होते. ब्रिटीश संसद आणि भारतामध्ये एकाच वेळी अर्थसंकल्पातील तरतुदींच्या घोषणा व्हाव्यात या उद्देशाने हा अर्थसंकल्प भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजता मांडला जायचा. आता यामागील रंजक गोष्ट म्हणजे भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच IST आणि ब्रिटनमध्ये या कालावधीत वापरला जाणारा ब्रिटीश समर टाइम म्हणजेच BST मध्ये साडेचार तासांचं अंतर आहे. IST हा BST पेक्षा साडेचार तास पुढे म्हणजेच BST+4.30 Hours आहे. त्यामुळेच भारतात जेव्हा 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा तेव्हा तो इंग्लंडमध्ये तेथील वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता सादर व्हायचा. तेथील राज्यकर्त्यांसाठी हीच वेळ सोयीस्कर असल्याने सहाजिक आहे भारतात हा अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता मांडला जायचा.

कोणी आणि कधी मोडली ही प्रथा? काय कारण दिलं?

मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वर्ष ही प्रथा अशीच सुरु होती. अखेर 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला. 27 फेब्रुवारी 1999 हीच ती तारीख जेव्हा भारतात पहिल्यांदाच सकाळी अर्थसंकल्प मांडण्यात आला. ब्रिटीश आपल्याला सोडून गेल्यानंतर आपण नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि आपल्या सोयीप्रमाणे सकाळी अर्थसंकल्प मांडल्यास चर्चेसाठी अधिक वेळ मिळतो असं सरकारकडून सांगण्यात आलं. यशवंत सिन्हा यांनी तसा युक्तीवादही केला होता. 

नक्की वाचा >> Union Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?

आधी फेब्रवारीच्या शेवटी मांडला जायचा अर्थसंकल्प आता पहिल्याच दिवशी होतो सादर, कारण...

विशेष म्हणजे केवळ वेळच नाही अर्थसंकल्प मांडण्याची तारीखही बदलण्यात आली आहे. पूर्वी फेब्रुवारी महिन्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जायचा. मात्र 2017 साली म्हणजेच मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना 2017 साली 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला. या बदलासंदर्भात युक्तीवाद करताना जेटली यांनी फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडल्यास एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून नव्या तरतुदी लागू करण्यासाठी फार कमी वेळ सरकारला मिळतो. त्यामुळेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला तर यासाठी तब्बल एका महिन्याचा कालावधी अधिक मिळेल, असं सांगत अर्थसंकल्प मांडण्याची तारीख बदलण्यात आली. मागील सात वर्षांपासून 1 फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प सादर केला जातो. यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीलाच मांडण्यात आलेला.