नवी दिल्ली : राजीव प्रताप रूडी आणि उमा भारती या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच मोदींचे आणखी काही मंत्री राजीनामा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाईल, तर अशोक गजपती राजू यांचे विमान उड्डाण मंत्रालयही काढण्यात येईल, अशी माहिती आहे.
दरम्यान जलसंधारण आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांच्या कामकाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जात आहे. उमा भारती यांच्या कामकाजाबाबत मोदी समाधानी नव्हते.
उमा भारतींनी अनेक वेळा मोदींना तोंडघाशी पाडलं. तसंच मोदींचा इस्रायल दौरा ठरला असताना गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी इस्रायलनं तंत्र विकसीत केलं होतं. याबाबतचा करार करण्यासाठी मोदींनी बोलावूनही उमा भारती गेल्या नाहीत, म्हणून मोदी नाराज झाले होते. तसंच उमा भारती कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्य करूनच चर्चेत होत्या. ही सगळी कारणं उमा भारतींच्या राजीनाम्यामागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.