M.Phil मान्यताप्राप्त डिग्री नाही, प्रवेश देऊ नका; UGC चे विद्यापीठांना निर्देश

M.Phil ही मान्यताप्राप्त पदवी नसून, तुमच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करु नका असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत

शिवराज यादव | Updated: Dec 27, 2023, 05:23 PM IST
M.Phil मान्यताप्राप्त डिग्री नाही, प्रवेश देऊ नका; UGC चे विद्यापीठांना निर्देश title=

M.Phil म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केलं आहे. युजीसीने यासंदर्भात विद्यापीठांना पत्र लिहून इशाराच दिला आहे. तुमच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करु नका असे स्पष्ट निर्देश युजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. तसंच युजीसीने विद्यार्थ्यांनाही M.Phil साठी प्रवेश घेऊ नका असं सांगत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सांगितलं आहे की, "काही विद्यापीठ एम.फील (मास्टर ऑफ फिलॉसॉफ़ी) साठी अर्ज मागवत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच एम.फील पदवी ही मान्यताप्राप्त पदवी नसल्याचं सर्वांच्या निदर्शनास आणून दिले जात आहे".

"यूजीसी (पीएचडी पदवीसाठी किमान पात्रता आणि प्रक्रिया) नियम, 2022 चा नियम क्रमांक 14 स्पष्टपणे नमूद करतो की उच्च शैक्षणिक संस्था कोणताही एम.फील प्रोग्राम ऑफर करणार नाहीत," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आयोगाने विद्यापीठांना शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी कोणत्याही एम.फील कार्यक्रमातील प्रवेश तात्काळ रोखण्यास सांगितलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना कोणत्याही एम.फील कार्यक्रमात प्रवेश न घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचं मनीष जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.