मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. जेडीएस या निवडणुकीत 'किंग मेकर' ठरणार असं दिसतंय... त्यादृष्टीने काँग्रेसनं जेडीएसच्या मदतीनं सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. मात्र, कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मात्र धाबे दणाणले... पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीनं या बैठकीसाठी मंत्री, आमदार, नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप निवडणुका जिंकतं पण पोटनिवडणुका हरतं, अशा शब्दांत भाजपला टोला हाणलाय.
कर्नाटक मध्ये जे जे जिंकले त्या सर्वाचे मी अभिनंदन करतो....भाजपचंही अभिनंदन, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. सोबतच, कर्नाटक मधील नव्या सरकारने सीमा भागातील मराठी माणसाला न्याय द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलंय. ज्या राज्यांनी आत्तापर्यत भाजपच्या राजवटीचा अनुभव घेतला आहे तिथली जनता त्यांचा अनुभव मतपेटीतून व्यक्त करते... आणि म्हणूनच भाजप निवडणुकीत जिंकते आणि पोटनिवडणुकीत हरते हे आतापर्यंतच चित्र आहे... पालघर पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार, अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वासही व्यक्त केला.
तंत्र मंत्र यंत्र जे काही आहे ते एकदा होऊनच जाऊ द्या... भाजपनेही एकदा या देशात मतपत्रिकेने मतदान होऊ देत... खुल्या वातावरण बॅलेट पेपरने या देशात मतदान घ्या आणि एकदाचा काय तो संशय पिशाच्च दूर करा... असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकप्रकारे राज ठाकरेंचीच 'री' ओढलीय.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजय मिळवला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे हे आधीपासून भाजपाच्या ज्या गोष्टीवर आक्षेप घेत होते, किंवा संशय व्यक्त करत होते, त्याचा आधार घेत त्यांनी पुन्हा हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जोडण्यावरून प्रचंड विरोध केला आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयावर राज ठाकरे यांनी अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत, विजयोत्सवात रंगलेल्या भाजपाला टोला हाणला आहे. राज ठाकरे यांनी भाजपाचा कर्नाटकात झालेल्या विजयावर म्हटलं आहे, 'एव्हीएम मशीन की जय!'... राज ठाकरे हे नेहमीच आपल्या सभांमधून भाजपांचा, मोदींचा तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील कार्याची वाहवा करणारे पहिले नेतेदेखील राज ठाकरेच होते.