नोए़डा : नोएडात असलेला ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झाला आहे. 3700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांच्या सहाय्याने या टॉवरचे पाडकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या 9 सेकंदात हा टॉवर पत्यासारखा कोसळला आहे. सुपरटेक कंपनीला हा टॉवर पाडण्याचा खर्च अंदाजे 18 कोटी रुपये आला आहे. हा टॉवर कोसळल्यानंतर आता परीसरात फक्त भला मोठा ढिगारा आणि धुळीचे लोण पसरले आहे. त्यामुळे आता ट्विन टॉवरच्या सर्व ढिगाऱ्यांचे काय होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते कसे काढले जाईल? चला तर जाणून घेऊय़ात.
टॉवर 9 सेकंदात जमीनदोस्त
नोएडा सेक्टर 93A मध्ये असलेला ट्विन टॉवरचं आज दुपारी 2.30 वाजता जमीनदोस्त करण्यात आला आहे. अवघ्या 9 सेकंदात हा टॉवर पत्यासारखा कोसळला आहे. बिल्डर कंपनी सुपरटेकने या पाडकामाची जबाबदारी घेतली होती. या पाडकामासाठी त्यांना 18 कोटी रुपये खर्च आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 3,700 किलोपेक्षा जास्त स्फोटके वापरण्यात आली आहेत.
धुळीचं साम्राज्य
ट्विन टॉवर्समध्ये झालेल्या स्फोटानंतर सुमारे 3 किलोमीटरपर्यंत धुळीचे ढग पसरू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान ट्विन टॉवरच्या पाडकामानंतर उडणाऱ्या धुळीचा लोकांना पुढील तीन ते चार दिवस त्रास होऊ शकतो.हे टाळण्यासाठी लहान मुले आणि वृद्धांनी मास्क घालणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मास्क घालण्याचे आवाहन
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विपुल सिंह यांनी सांगितले की, ट्विन टॉवर पडल्यानंतर हवेत दोन प्रकारची धूळ उडतली.धुळीचे खडबडीत कण लगेच जमिनीवर पडतील, पण वाराही वाहत असल्याने लहान कण हवेत बराच काळ राहतील. धुळीचे छोटे कण पुढील तीन ते चार दिवस दोन ते तीन किलोमीटर परिसरात राहतील. जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर तो त्यापेक्षा कमी वेळ राहील. तसेच ते पुढे म्हणतात, जर पाऊस पडला तर लवकरच ही परिस्थिती सामान्य होईल. न दिसणारे सिमेंटचे छोटे कण मानवाला हानी पोहोचवू शकतात आणि नंतर फुफ्फुसात जाऊन समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी लोकांना मास्क घालणे आवश्यक आहे.
ढीगारा उचलण्यासाठी 3 महिने लागणार
ट्विन टॉवर्सच्या पाडकामानंतर त्याचा ढिगारा साफ करण्यासाठी सुमारे 3 महिने लागणार आहेत. यावर प्राध्यापक विपुल सिंग पुढे म्हणाले की, ट्विन टॉवरचा ढिगारा पाडल्यानंतर तो वाहून नेण्यासही वेळ लागणार आहे. तसेच तो ट्रकमधून वाहुन नेला जात असताना हे ट्रक व्यवस्थित झाकले जात आहेत की नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान ट्विन टॉवर पाडताना 18 कोटी रुपयांचा बोजा बिल्डरला सोसावा लागला आहे. तर देशातील स्थावर मालमत्तेतील असा हा पहिलाच किस्सा असेल ज्याची इतिहासात नोंद होणार आहे.