बिहारच्या निराधार महिलांची सुरक्षा तृतीयपंथीयांच्या हाती!

निवारा गृहांत ट्रान्सजेन्डर सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत

Updated: Jul 18, 2018, 08:44 AM IST
बिहारच्या निराधार महिलांची सुरक्षा तृतीयपंथीयांच्या हाती!  title=

नवी दिल्ली : बिहारमध्ये निराधार महिलांना संकटापासून वाचवण्यासाठी उभारण्यात आलेले निवारा गृहच त्यांच्यासाठी संकट ठरताना दिसत आहेत. बिहार सरकारनं अल्पावास गृहातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांची दखल घेत अशा घटना रोखण्यासाठी नवा निर्णय घेतलाय. आता निवारा गृहांत ट्रान्सजेन्डर सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. 

बिहारमध्ये राज्य सरकारनं वेगवेगळ्या कारणांवरून घरांतून बेदखल झालेल्या मुलींना आणि स्त्रियांना आश्रय देण्यासाठी निवारा गृह उभारले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी मुजफ्फरपूरच्या निवारा गृहात देह व्यापाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये स्टाफसहीत १० जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर छपरामध्ये निवारा गृहात एका महिलेसोबत लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलं... या प्रकरणातही दोन जणांना अटक करण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली.

या प्रकरणांचा आता राज्य सरकारनंही धसका घेतलाय. त्यामुळे बिहार सरकारनं ट्रान्सजेन्डर लोकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या रुपात तैनात करण्याचा निर्णय घेतलाय.

समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव अतुल प्रसाद यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 'टीआयएसएसच्या अहवालात लैंगिक शोषणाचा उल्लेख करण्यात आलाय आणि ही प्रकरणं थांबवण्याचा उपायही सुचवण्यात आलाय. टीआयएसएसनं अनेक मुलींची नाव लिहिलीत. परंतु, संपूर्ण रिपोर्ट सार्वजनिक करता येणार नाही. आम्ही चौकशीच्या आधारावर मुजफ्फरपूरमध्ये एका प्रकरणाची पोलिसांत नोंद केलीय आणि आमच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी या निवारा गृहांचं ऑडिट करण्याचे आदेश दिलेत'