ट्रायकडून केबल ऑपरेटर्सना चाप; 'जिओ'आधीच केबल, डीटीएच एवढं स्वस्त

 केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या मनमानीवर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने आणखी नियंत्रण आणलं आहे. 

Updated: Nov 20, 2018, 01:37 PM IST
ट्रायकडून केबल ऑपरेटर्सना चाप; 'जिओ'आधीच केबल, डीटीएच एवढं स्वस्त title=

नवी दिल्ली : केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या मनमानीवर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने आणखी नियंत्रण आणलं आहे. विशेष करून  केबल ऑपरेटर्ससाठी ही मोठी चपराक असणार आहे, कारण डीटीएच कंपन्यांचे पॅकेजेस हे जाहीर असतात, पण काही केबल ऑपरेटर्स मनमानी करतात, त्यांच्यासाठी निश्चितच हा चाप असणार आहे. TRAIने केबल आणि ब्रॉडकास्ट इंडस्ट्रीसाठी नवीन नियम जारी केले आहेत. यानुसार, ग्राहक जेवढे चॅनल पाहणार असेल, तेवढेच पैसे त्याला द्यावे लागतील. 

TRAI ने आपल्या आदेशात म्हटलं आहे. डीटीएच किंवा केबल ऑपरेटर्सने १३० रूपये प्रति महिन्यात '१०० फ्री टू एअर' चॅनल दाखवावेत, असा नवा नियम २९ डिसेंबरपासून लागू होणार आहे.जर एखादा ग्राहक फ्री टू एअर चॅनल ऐवजी दुसरं चॅनल पाहू इच्छीत असेल, तर ग्राहकाला त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. 

नव्या नियमानुसार इलेक्टरॉनिक युझर गाईडमध्ये प्रत्येक चॅनलची एमआरपी म्हणजेच किंमत दिलेली असेल. तसेच यापेक्षा अधिक पैसे वसूल करणे, बेकायदेशीर असणार आहे. नव्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

TRAI चे चेअरमन आरएस शर्मा यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितलं, कोणताही केबल ऑपरेटर किंवा डीटीएच कंपनी ग्राहकांवर जबरदस्तीने पॅकेज टाकू शकत नाही. शर्मा यांनी म्हटलंय, केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच कंपन्यांची मनमानी रोखली जाईल आणि ग्राहक कमी पैशात आपलं आवडतं चॅनेल पाहू शकतील.