Pulgaon Army depot Blast: सैन्याच्या दारुगोळा भांडारात भीषण स्फोट

पूलगाव येथील दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ 

ANI | Updated: Nov 20, 2018, 12:25 PM IST
Pulgaon Army depot Blast: सैन्याच्या दारुगोळा भांडारात भीषण स्फोट title=

मुंबई : आशियातील दुसरा सर्वात मोठा दारुगोळा डेपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील पूलगाव येथे असणाऱ्या दारुगोळा भांडारात आज सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात जवळपास ६ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. 

अतिशय मोठ्या अशा या स्फोटात १० जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटकं निकामी करण्याच्या कामादरम्यान हा स्फोट झाल्याचं स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आलं आहे.

राजकुमार भोहते, नारायण पचारे आणि  प्रभाकर वानखेडे या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. 

पुलगावमध्ये झालेला हा भीषण स्फोट म्हणजे एक अपघात असल्याचं स्पष्टीकरण भारतीय लष्कराकडून देण्यात आलं आहे. 

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर नजीकच्या सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. 

यापूर्वीही झाली होती अशी दुर्घटना 

पुलगावमध्ये झालेल्या स्फोटामुळे २०१६ मध्ये झालेल्या भीषण स्फोटांच्या आठवणी जाग्या झाल्या. जेव्हा मोठं अग्नितांडव उसळलं होतं. त्यावेळी झालेल्या स्फोटात २ अधिकाऱ्यांसह १६ जवान शहीद झाले होते. या स्फोटांच्या भीषण आवाजाने १६ ते १७ जवानांच्या कानांचे पडदेही फाटले होते. या स्फोटांमुळे परिसरातल्या अनेक घरांचं नुकसान झालं. त्यावेळच्या स्फोटात लेफ्टनंट कर्नल आर. एस. पवार आणि मेजर मनोज कुमार या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.