मुंबई : यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस पडत आहे, त्यामुळे शहरांमध्ये ट्रॅफिक आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पाऊस आज म्हणजेच शनिवारीही सुरू राहणार आहे. यासाठी विभागाने यलो अलर्ट जारी करून लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजही उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आलीये.
हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा मान्सून देशाच्या काही भागातून निघून गेला आहे. परंतु उत्तर भारतात ते सप्टेंबर अखेरपर्यंत सक्रिय राहू शकते. या दरम्यान, विविध शहरांमध्ये हलका ते जोरदार पाऊस सुरू राहू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानलाही आज पावसाबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय.
मुसळधार पावसाचा अंदाज पाहता उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आलीये. यामध्ये गाझियाबाद, आग्रा, फिरोजाबाद, मैनपुरी, गौतम बुद्ध नगर, इटावा यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत.
हवामान खात्याने आज दिल्ली एनसीआरसाठी विशेष अलर्ट जारी केलाय. या भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने योग्य ती व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आलेत.