Infant Branded With Hot Iron Rod: दीड महिन्याच्या बाळाला श्वसनाचा त्रास होत होता. मात्र त्यावर वैदयकीय उपचार करायचे सोडून अंधश्रद्धेच्या आहारी जात बाळावर अघोरी उपचार केले. मात्र, या उपचारांमुळं दीड महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील शाहडोल तालुक्यातील ही घटना आहे. पालकांच्या निष्काळजीपणामुळं दीड महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे.
बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावर उपचार करण्याऐवजी पालकांनी लोखंडाच्या सळईने बाळाच्या शरीरावर चटके दिले. पालकांनी केलेल्या या अघोरी आणि अमानुष प्रकारामुळं दीड महिन्यांच्या बाळाची प्रकृती बिघडली. बाळाला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच बाळाचा मृत्यू झाला. सिव्हिल सर्जन जी एस परिहार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बांधवा गावातील ही घटना आहे. दीड महिन्यांच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला गरम लोखंडी रॉडने चटके देण्यात आले. यामुळं त्याच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. बाळाला अधिकच त्रास होऊ लागल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. उपचार सुरू असतानाच बाळाची प्राणज्योत मालवली.
21 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्याला त्याच्या पालकाने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर दुखापतीमुळं बाळाला न्यूमोनिया झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दीड महिन्याच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.