नवी दिल्ली : तीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होईल, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलाय.
या कायद्यानंतर मुस्लिम महिलांना भाजप महिला मोर्चाच्यावतीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पोलीस तक्रारींपासून न्यायालयीन लढ्यापर्यंत सर्व मदत भाजप महिला मोर्चा पीडित मुस्लिम महिलांना करेल असं रहाटकर यांनी सांगितलं.
मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे.
या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व तिच्या मुलांना पोटगी देण्याचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल तलाक बेकायदा ठरवूनही तो सुरूच असल्यानं हा कायदा करण्यात येत आहे.
हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक तलाक तलाक म्हणणे किंवा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.