मोठी बातमी! हायटेक चोरट्याला बेड्या, अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी मारला डल्ला

Thief Robbed Ajit Pawar Relatives Arrested: अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या पुण्यातील घरी केलेल्या चोरीमध्ये या चाराने 4 तोळे सोन्याबरोबरच हत्यारही चोरलं होतं.

Updated: Feb 27, 2023, 03:28 PM IST
मोठी बातमी! हायटेक चोरट्याला बेड्या, अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी मारला डल्ला title=
Ajit Pawar Relative Robbed

Ajit Pawar Relative Robbed Thief Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकाच्या घरी चोरी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन या आरोपीला अटक केली आहे.

1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या जगदीश कदम यांच्या घरी या चोरट्याने डल्ला मारला होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद इरफान असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीचं टोपणनाव रॉबिनहूड असं आहे. इरफानविरोधात घरफोडी आणि चोरीचे तब्बल 27 गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. पोलिसांनी इरफानला अटक करुन त्याच्याकडून 1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंजाबमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हे घबाड पोलिसांच्या हाती लागलं.

गुगलवरुन करायचा चोरीची प्लॅनिंग

पोलिसांना इरफानकडे ज्या चोरी केलेल्या गोष्टी सापडल्या त्यामध्ये जॅग्वार कंपनीची आलीशान कार, 10 किंमती घड्याळं, दागिन्यांचा समावेश आहे. चोरीच्या मालाबरोबरच इरफानकडे पोलिसांना हत्यारही सापडलं आहे. यामध्ये एक पिस्तूल, 12 जिवंत काडतुसांचा समावेश आहे. इरफानची मोडस ऑपरेंडीही फारच विचित्र होती. गुगलवर वेगवगेळ्या शहरांमधील हायप्रोफाइल ठिकाणांची माहिती इरफान गोळा करायचा. त्यानंतर त्या ठिकाणी चोरी कशी करता येईल, कोणत्या मार्गाने लवकरात लवकर पळ काढता येईल यासंदर्भातील नियोजन तो गुगलच्या मदतीने करायचा.

अजित पवारांच्या नातेवाईकाच्या घरी काय चोरलं?

पुण्यामधील बाणेर रोडवरील सिंध सोसायटीमध्ये अजित पवारांचे नातेवाईक असलेल्या कदम यांच्या घरातूनही इरफानने बराच मुद्देमाल चोरला होता. यामध्ये एक पिस्तूल, जिवंतर कारडुसे, 3 महागडी घड्याळं, 4 तोळं सोन्यावर त्याने डल्ला मारला होता. इरफाननेच स्वत:ला रॉबिनहूड असं टोपणनाव दिलं होतं. यापूर्वीही त्याने अशाप्रकारे अनेक राज्यांमध्ये लाखो रुपयांच्या चोऱ्या केल्या आहेत. 

अन्य तिघांनाही केली अटक

इरफानला चोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या अन्य 3 साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. थेट पंजाबमध्ये जाऊन धडक कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांवर या कारवाईनिमित्ताने कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.