चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं

एक विचित्र घटना समोर आली आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 15, 2017, 03:52 PM IST
चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं title=
Representative Image

नवी दिल्ली : एटीएममधील पैसे चोरल्याच्या घटना तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरीच्या घटना कैदही होतात. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

चोरांना एटीएम मशीनमधून पैसे चोरी करता न आल्याने त्यांनी थेट ATM मशीनच चोरी केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी चोरी केलेल्या एटीएम मशीनमध्ये जवळपास ३० लाख रुपये होते.

चोरट्यांना एटीएम मशीनची सिस्टम तोडता न आल्याने त्यांनी मशीन चोरुन पळ काढला. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील छावला परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केमिकल फवारलं जेणेकरुन त्यांचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर केमिकल फवारल्याने या घटनेचं स्पष्ट फुटेज उपलब्ध नाहीये.

आरोपी एटीएम मशीनचं सिस्टम तोडणार होते. मात्र, त्यांना ते तोडता आलं नाही आणि त्यामुळे त्यांनी चक्क एटीएम सिस्टमच चोरून नेलं. या ATM मशीनमध्ये जवळपास ३० लाख रुपयांची रोकड होती. पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण एटीएम सेंटरच्या आत शिरल्याचं दिसत आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर आणखीन काही लोक उभे असल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे.