Varanasi Gyanvapi Survey ASI: ज्ञानवापी परिसरामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) सुरु असलेल्या सर्वेक्षणाला 2 दिवस पूर्ण झाले आहेत. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी आयएएसची टीम ज्ञानवापी परिसरामध्ये आणि मशिदीच्या सेंट्रल हॉलची पहाणी करण्यासाठी पोहोचली. 17 व्या शतकामध्ये मशिदीच्या बांधकामाआधी या ठिकाणी एक हिंदू मंदिर अस्तित्वात होतं की नाही यासंदर्भातील तपशील या पहाणीमधून समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वेक्षणादरम्यान मुस्लीम पक्षाचे 5 सदस्यही उपस्थित होते. रविवारी तिसऱ्या दिवशीही एएसआयचे अधिकारी सर्वेक्षणासाठी या परिसरामध्ये दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारासंदर्भात बोलताना ज्ञानवापीचे जनरल सेक्रेटरी आणि मुख्य इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांनी औरंगजेबसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे.
इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मशिदीच्या तळाशी असलेली खोली, मंदिर पाडून मशीद बांधण्यात आलं आहे का? हिंदू प्रतीक चिन्हं मशिदीमध्ये सापडली का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं दिली. तळाशी असलेली खोली मुस्लिम पक्षकारांपैकी 5 जणांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आली. यामध्ये एएसआयचे अधिकारीही गेले. येथे सर्वेक्षण झाले. ज्या ठिकाणी मशिदीमध्ये नमाज पठण होते त्या खाली या खोलीत असलेल्या भागाचंही सर्वेक्षण करण्यात आलं. या पुढेही त्यांना ज्या खोल्या तपासायच्या आहेत, जिथे पहाणी करायची आहे तिथे त्यांना जाऊ दिलं जाईल. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करु, असं इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांनी सांगितलं.
मंदिर तोडून मशीद उभारण्यात आली आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं, असं इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना, "असं होऊ शकत नाही. इस्लाममध्ये असा कोणताही नियम नाही. ही औरंगजेबने बनवलेली मशीद आहे. खास करुन औरंगजेबकडून असं काही होईल असं म्हणता येणार नाही. औरंगजेब हा वेगळा होता. तो फार धार्मिक होता. त्याने मंदिर पाडून मशीद उभारली असेल असं मला वाटत नाही. उलट त्याने मशिदींबरोबर मठांनाही जमिनी दिल्या. मंदिरांनाही जमिनी दिल्या. आजही बनारसमधील मोठमोठ्या मठांमध्ये तुम्हाला औरंगजेबचे फर्मान पाहायला मिळतील," असं इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी म्हणाले.
मशिदींच्या भिंतींवर हिंदू प्रतीक चिन्हं मिळाली का? असं इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांना विचारण्यात आलं. त्यावर इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांनी, "आम्हा दर शुक्रवारी तिथे नमाज पठण करतो. आम्हाला आतापर्यंत तिथं असं कोणतंही निशाण दिसून आलं नाही. तर तिथे असं काही असेल असं आम्ही का मानावं. फोटोंमध्ये त्रिशूल आणि स्वस्तिक बनवल्यासारखे निशाण दिसतात. इथे आलेले मुघल हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. ते हिंदू बांधवांना स्वत:बरोबर घेऊन चालायचे. त्यामुळेच ते मुस्लीम असूनही या देशात आले आणि त्यांनी 800 वर्ष एवढ्या मोठ्या देशावर राज्य केलं," आपलं मत मांडताना म्हटलं.