नवी दिल्ली - राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. 'झी न्यूज'ने या संदर्भातील वृत्त प्रसारित करून काँग्रेस आणि खुद्द नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या.
काँग्रेसने आणि सिद्धू यांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता उलट 'झी न्यूज'वरच बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. समाज माध्यमांवरही काँग्रेस आणि सिद्धू यांच्या काही पाठिराख्यांनी 'झी न्यूज' विरोधात मोहीम उघडली. काही माध्यमांनी आणि पत्रकारांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून तर संबंधित व्हिडिओतील घोषणा देतानाची दृश्ये काढून टाकण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने एडिटिंग केलेले व्हिडिओ प्रसारित करण्यात आले.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर 'झी न्यूज'ने अलवारमध्ये सिद्धू यांची सभा झाली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींशी आणि पत्रकारांशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष काय घडले, याची माहिती त्यांच्याकडून घेतली. सभेवेळी तिथे उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी चित्रित केलेले काही व्हिडिओ 'झी न्यूज'ला मिळाले आहेत. सभेला उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने तर त्यावेळी तिथे 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या, असे 'झी न्यूज'च्या कॅमेऱ्यापुढे सांगितले.
या प्रकरणी काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी 'झी न्यूज'वर चुकीचा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप केला होता. सभेवेळी घटनास्थळी 'सत श्री अकाल' अशा घोषणा दिल्या गेल्याचे त्यांनी म्हटले होते. 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी सुर्जेवाला यांच्या आरोपांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले. सुर्जेवाला यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलेला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिटिंग केलेला असून, त्यामध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याची दृश्ये वगळण्यात आली आहेत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
Dear @rssurjewala Ji I have always respected you as a politician & a person.Never thought someone as seasoned as you will fall into the trap of fake news.Sharing the original video.Take your time to watch it & feel free to retract your comments.@sherryontopp pic.twitter.com/z4oUI2XkcY
— Sudhir Chaudhary (@sudhirchaudhary) December 4, 2018
या पूर्वीही 'झी न्यूज'वर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. २०१६ मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्याचे वार्तांकन केल्यानंतर अशाच पद्धतीने 'झी न्यूज'विरोधात आरोप करण्यात आले होते. त्यानंतर न्यायवैद्यक चाचणीमध्ये संबंधित व्हिडिओ हे खरेच असल्याचे स्पष्ट झाले होते.