Trending News : परिस्थितीपुढे माणुस गुडघे टेकतो. परिस्थितीमुळे हतबल झालेल्या पित्यावर मुलाच्या वाढदिवसादिवशीच तुरुंगात जावे लागले. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने एका पित्याने स्वत:चे रक्त विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्याला अपयश आले. शेवटी त्याने केलेला शेवटचा प्रयत्न देखील फसला आणि त्याला बेदम मारहाण सहन करावी लागली. मध्य प्रदेशात ही हृदयद्रावक घटना घडलेय. या पित्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल.
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे ही घटना घडलेय. ब्रिजेश धाकड असे या पित्याचे नाव आहे, गोपाळपूर येथील रहिवासी असलेल्या ब्रिजेशने मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे मिळावे यासाठी प्रयत्न केले पण. परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला. या पित्यासोबत जे काही घडलं ते कुणही कल्पनाही करु शकत नाही.
ब्रिजेश यांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसासाठी केक आणि फुगे आणा अशी मागणी मुलाने ब्रिजेश यांच्याकडे केली. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्यामुळे ब्रिजेश याने रक्तदान करुन पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. ब्रिजेश कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेले. मात्र, सध्या रुग्णालयात रक्ताची गरज नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे आता काय करावे असा प्रश्न ब्रिजेश यांन पडला.
आता पैसे कुठून आणायचे असा प्रश्न ब्रिजेश यांना पडला. दरम्यान, चोरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. झिंगुरा कॉलनीतील रहिवासी राजेश श्रीवास्तव नावाचा रुग्ण याच रुग्णालयात भरती होते. त्यांचा मोबाईल वॉर्डमध्ये चार्जिंगला लावण्यात आला होता. ब्रिजेश यांनी या रुग्णाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. नेमकं याच वेळी राजेश श्रीवास्तव यांच्या नातेवाईंकानी ब्रिजेश यांना मोबाईल चोरताना पाहिले. नातेवाईंकांनी ब्रिजेश यांना मोबाईल चोरताना रंगेहात पकडले. संतप्त नातेवाईंकानी ब्रिजेश यांना बेदम मारहाण केली. यावेळी रुग्णलयात उपस्थित असलेल्या इतर लोकांनी देखील चोर चोर म्हणत ब्रिजेश यांना चोपून काढले.
राजेश श्रीवास्तव यांच्या नातेवाईकांनी ब्रिजेश यांना मारहाण करत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी ब्रिजेश यांची चौकशी केली. मुलाचा वाढदिवस आहे. पण, हातात एकही पैसा नाही. यामुळे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी रक्तदानाच्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अपयशी ठरल्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे ब्रिजेश यांनी पोलिसांना सांगितले. राजेश श्रीवास्तव यांच्या नातेवाईकांना देखील हे ऐकून वाईट वाटले.