भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे

Jammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 13, 2024, 09:46 AM IST
भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे title=
Terror attacks in Jammu Kashmir animal smuggling kathua bhdrawah pakistan india

Jammu Kashmir terror attack: जम्मू काश्मीरमध्ये मागील काही वर्षे दहशतवादी कारवायांचं प्रमाण घटलेलं असतानाच अचानक इथं तणावाची परिस्थिती पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) आडून होणाऱ्या या दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारतात अशांतता पसरवण्याचा हेतू या माध्यमातून साध्य करण्याचा कट असल्याचं आता स्पष्ट झाल्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. पोलीस आणि लष्करानं मिळून इथं दहशतवाद विरोधी मोहिम हाती घेतली असून, या यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांकडून धक्कादायक माहिती मिळाल्यानं सदर भागातील प्रत्येक लहानसहान हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. 

भारतातील शांततेला धक्का देण्यासाठी म्हणून पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती सुरु असून, गेल्या पाच दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील बहुतांश भागांमध्ये सतर्कता पाळली जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार मागील काही काळामध्ये काश्मीरच्या अंतर्गत भागांमध्ये शेजारी राष्ट्रातून अनेक दहशतवाद्यांनी शस्त्रसाठ्यासह घुसखोरी केली असून, ते खोऱ्यातील अंतर्गत भागांमध्ये लपून बसले आहेत. इथूनच डोडा, रियासी, बसंतगढ, कठुआ, भद्रवाह अशा भागांवर केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचे कटही रचले जात असल्याची माहिती आहे. 

कठुआतील हिरानगर भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली, जिथं काही संशयित दहशतवाद्यांनी पशू तस्करीच्या आडून भारतात घुसखोरी केली असून याच बहाण्यानं ते मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ने- आण करत आहेत. ज्यामुळं सध्या या भागांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळत आहे. 

अमरनाथ यात्रेवर सावट 

काही दिवसांत सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेवरही दहशवाद्यांचं सावट असून, सुरक्षा यंत्रणेच्या एका धडक कारवाईमुळं ही बाब समोर आली. जिथं दहशतवाद्यांना ताब्यात घेत लष्करानं 8 मॅगजीन, हँड ग्रेनेड, बॅग, 2 लाख 10 हजारांची रोकड, M4 रायफल (with night scope) ताब्यात घेण्यात आली. याशिवाय त्यांच्याकडून पाकिस्तानी बनावटीचे चॉकलेट, खाद्यपदार्थ, सीरिंज, औषधं आणि संवाद साधण्यासाठीची काही उपकरणंही यंत्रणांनी ताह्यात घेतली. या कारवाईनंतर संपूर्ण अमरनाथ यात्रा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

हेसुद्धा वाचा : चिंता वाढली; भारतातील जवळपास 86 टक्के नोकरदार वर्गाचा 'या' समस्येशी न संपणारा लढा सुरुच 

यात्रेला भाविकांची होणारी गर्दी पाहता सध्या कोणताही धोका डोकं वर काढू नये यासाठी इथं तीन स्तरांमध्ये सुरक्षाव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या घनदाट जंगलांचा फायदा घेऊन इथं सध्या दहशतवादी तळ ठोकत असल्यामुळं यानजीकच्या भागांवर यंत्रणा करडी नजर ठेवून आहेत.