रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : हिंदुत्वाचा अजेंडा राबवत भाजपनं केंद्रातली सत्ता हस्तगत केली... भाजपची पारंपरिक व्होट बँक असलेल्या हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखलीय... त्यासाठी राहुल गांधींनी हिंदू मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केलाय.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सध्या टेम्पल रनचा खेळ सुरू केलाय... मोबाईलवर नाही, तर प्रत्यक्षात... गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हिंदू मतं जिंकण्यासाठी काँग्रेसनं ही खास रणनीती आखलीय... राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौऱ्यात त्यांनी चक्क पाच मंदिरांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले.
- सौराष्ट्र द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिरात भगवान कृष्णाचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरूवात केली.
- चोटीला येथील चामुंडा माताजी मंदिर
- कागवड येथील खोडलधाम मंदिर
- राजकोटच्या वीरपूर येथील जलाराम बापा मंदिर आणि
- दसदन येथील दासी जीवन मंदिरात त्यांनी माथा टेकला
- राजकोटच्या दुर्गा देवीसमोर राहुल गांधींनी आरतीही केली
चामुंडा माता मंदिराच्या एक हजार पायऱ्या राहुल गांधी १५ मिनिटांत चढले. पटेल समुदायाचं श्रद्धास्थान असलेल्या कागवडच्या खोडलधाम मंदिरात ते गेले तेव्हा, जय सरदार, जय पाटीदार या घोषणेनं त्यांचं स्वागत झालं. दलित - बौद्धांचं श्रद्धास्थान असलेल्या दासी जीवन मंदिरात त्यांनी स्थानिकांच्या समस्या समजून घेतल्या. जामनगरला नवरात्रीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या दौऱ्यात धार्मिक स्थळांसोबतच व्यापारी, विविध संघटना, शेतकरी आणि सामाजिक संस्थांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या. त्यांच्या रोड शो ला गर्दी झाल्यानं काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्यात.
राहुल गांधींचा दुसरा गुजरात दौरा ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान सुरू होणाराय. ५०० किलो मीटरच्या या दुसऱ्या दौऱ्यातही ते धार्मिक स्थळांना भेटी देणार आहेत. त्यावेळी
- नाडियादचं संतराम मंदिर
- फागवेलचं भठीजी महाराज मंदिर
- पवागडचं माता काली मंदिर
- आणि खेडाचं दकोर मंदिर इथं ते भेटी देणार आहेत
दिवाळीनंतर राहुल गांधींच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा उत्तर गुजरातमधून सुरू होईल. त्यावेळी अंबाजी, बेचर्जी, ऊंजा या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. या भागात अल्पसंख्याक समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या टेम्पल रन खेळीमुळं भाजपच्या गोटात खळबळ माजलीय. काँग्रेसच्या या हिंदूप्रेमामुळं मतांचं विभाजन होईल, अशी चिंता भाजपला वाटतेय.
कट्टर हिंदू विरोधी असलेल्या काँग्रेसला आपली ओळख बदलायचीय. त्यासाठीच राहुल गांधींनी 'टेम्पल रन' सुरू केलाय. त्यांना पटेलांचीही साथ मिळतेय. आता मंदिरातल्या देवांचा आशीर्वाद काँग्रेसचा वनवास संपवणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राहुल गांधी यांचे 'टेम्पल रन' ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. यात किती यश मिळतं आणि किती हिंदू मते काँग्रेसकडे आकर्षित होतात, हे गुजरात निवडणूकीच्या निकालातून कळेल.