मुंबई : मोबाईलवर बोलणं आणि नेट वापरणं आता महागणार आहे. एअरटेल कंपनीनं (Airtel Recharge Rate Incresed) दरवाढीची घोषणा केली असून अन्य दोन बड्या कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) लवकरच पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. भारती एअरटेलनं आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या टेरिफमध्ये मोठी वाढ केली आहे. या दरवाढीची अंमलबजावणी ही 26 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. (Telecom companies plans will become more expensive Airtel recharge rates will increase by 20 to 25 percent)
79 रुपयांचा बेस प्लॅन आता 99 रुपयांचा झालाय. तर 149 ऐवजी 179 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. एअरटेलचा सर्वात महागड्या प्लॅनमध्ये 501 रुपयांची वाढ करण्यात आलीये. या वाढीनंतर आता एअरटेलचे प्लॅन हे रिलायन्स जिओपेक्षा 30 ते 50 टक्के महाग झालेत.
यापूर्वी तीन्ही कंपन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये दरवाढ केली होती. आताही रिलायन्स आणि व्होडाफोन-आयडिया एअरटेलच्या पावलावर पाऊल टाकत शुल्कवाढ करण्याची शक्यता आहे. व्होडाफोन आयडियाचे सीईओ रवींदर ठक्कर यांनी तसे संकेतही दिलेत. त्यामुळे कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या कंपनीला थोडा दिलासा मिळू शकेल.
ऑगस्ट 2021च्या आकडेवारीनुसार देशात रिलायन्स जिओचे सर्वाधिक 44 कोटी 38 लाख ग्राहक होते. त्याखालोखाल एअरटेलचे 35 कोटी 41 लाख आणि व्होडाफोन आयडियाचे 27 कोटी 1 लाख ग्राहक होते.
ही दरवाढ इथेच थांबणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जातेय. एव्हरेज रेव्हेन्यू पर यूजर, अर्थात प्रत्येक वापरकर्त्याकडून मिळणारा महसूल 200 रुपये आणि नंतरच्या काळात 300 रुपयांपर्यंत जायाला हवा, असं एअरटेलनं एका निवेदनात म्हटलं होतं.
सप्टेंबरमध्ये जिओचा ARPU 143 रुपये 60 पैसे होता. तर व्होडाफोन आयडियाला 109 रुपये आणि एअरटेलला 153 रुपयांचा महसूल प्रत्येक ग्राहकामागे मिळत होता.
मोबाईल हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. मात्र कंपन्यांमधील स्पर्धेमुळे आपल्याला अत्यंत स्वस्तात ही सेवा वापरता येतेय. मात्र आगामी काळात मोबाईलसाठी खिशाला झळ बसणार आहे.