Coronavirus वर दहापट अधिक प्रभावी ठरतंय 'हे' औषध

वाचा सविस्तर वृत्त 

Updated: Sep 28, 2020, 10:47 PM IST
Coronavirus वर दहापट अधिक प्रभावी ठरतंय 'हे' औषध  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस Coronavirus चं संकट संपूर्ण देशभरात दिवसागणिक अधिक बळावर असतानाच आता या विषाणूतवर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक अत्यंत प्रभावी असं औषध सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे कोणा दुसऱ्या देशात नव्हे, तर भारतातच हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनावरील औषधं, लस यासंबंधीच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

जवळपास २३ औषधांच्या संशोधनानंतर आयआयटी दिल्लीनं हा दावा केला आहे. ज्यामध्ये teicoplanin नावाच्या ग्‍लायकोपेप्‍टाइड एँटीबॉयोटिक औषधामुळं कोरोनावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये आणखी आशा पल्लवित झाल्या आहेत. हे औषध एकदोन नव्हे तर, तब्बल दहापट अधिक प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

आयआयटी दिल्ली या संस्थेतील कुसुम स्‍कूल ऑफ बायोलॉजिकल सायंसेसनं कोरोनासाठीचं हे औषध शोधण्यासाठी जवळपास २३ औषधांची चाचणी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार इतर औषधांच्या तुलनेत जेव्हा teicoplanin च्या परिणामांची तुलना करुन पाहण्यात आली तेव्हा हे औषध दहा पट अधिक प्रभावी असल्याची बाब लक्षात आली. 

IIT Delhiतील प्राध्यापक अशोक पटेल हे या निरिक्षणाचं नेतृत्व करत होते. याबाबतत अधिक माहिती देत ते म्हणाले, 'teicoplanin च्या परिणामांची तुलना इतर औषधांशी करण्यात आली. teicoplanin सध्याच्या घडीला  SARS-COV-2 विरोधात वापरात असणाऱ्या हाइड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन आणि लोपिनैविर या औषधांच्या तुलनेत १०-२० पटींनी जास्त प्रभावी असल्याचं लक्षात आलं'. इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मैक्रोमॉलिक्‍यूल्‍समध्येही या संशोधनाबाबतची माहिती छापण्यात आली आहे. एम्समधील डॉ. प्रदीप शर्मा हेसुद्धा या संशोधनाचाच एक भाग असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

आणखी मोठ्या स्तरावर संशोधनाची आवश्यकता 

Teicoplanin हे एक ग्‍लायकोपेप्‍टाइड एँटीबायोटिक आहे. हे औषध माणसांमध्ये कमी टॉक्सिक प्रोफाईल असणाऱ्या ग्रॅम पॉजिटिव बॅक्‍टेरियल इन्‍फेक्‍शंसना ठीक करण्यासाठी वापरण्यात येतं. अमेरिकेतील फूड एँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडूनही याला मान्यता मिळाली आहे. असं असलं तरीही कोविड-19 विरोधात Teicoplanin च्या भूमिकेचा अधिक मोठ्या स्तरावर अभ्यास करण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली.