मुंबई : तामिळनाडू सरकारने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात लोकांना जन्मठेप शिक्षा सुनावली. या सात लोकांपैकी एक असलेल्या एक नलिनी हरिहरन (Nalini Hariharan) हिला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे. हा पॅरोल 25 किंवा 26 डिसेंबरपासून सुरू होईल. राज्य सरकारचे वकील हसन मोहम्मद यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती दिली. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही परोल मान्य केली आहे.
एस पद्मा म्हणजे नलिनीच्या आईने खंडपीठाकडे याचिका केली, तिने याचिकेत म्हटले आहे की, 'तिला (पद्मा) अनेक आजार आहेत आणि आपल्या मुलीने आपल्यासोबत राहावे अशी त्यांची इच्छा आहे.' या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे महिनाभर पॅरोलसाठी अनेक अर्ज केले होते. अनेक अर्ज केल्यानंतर आता नलिनी हरिहरनला एका महिन्याचा पॅरोल मिळाला आहे. हा पॅरोल 25 किंवा 26 डिसेंबरपासून सुरु होईल.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर येथे एलटीटीईच्या आत्मघाती हल्लेखोराने हत्या केली होती. या प्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी हे सात लोकं जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
नलिनी हरिहरनच्या आणखी एका याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे. तिने वेल्लोर मध्यवर्ती कारागृहातून सुटकेची मागणी केली आहे. नलिनी हरिहरन गेल्या तीन दशकांपासून तुरुंगात आहे.
1998 मध्ये एका ट्रायल कोर्टाने नलिनी हरिहरनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 2000 मध्ये नलिनी हरिहरनची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही राजीव गांधी हत्येतील दोषींना सोडण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात सात दोषींची सुटका करण्याची मागणी केली आहे.