चेन्नई : महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.
लष्करात कर्तव्य बजावताना हौतात्म्य आलेल्या पतीचे देशसेवेचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने स्वाती महाडिक यांनी आज पहिले पाऊल टाकले. स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि लष्करातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती महाडिक सैन्यात रुजू होत आहेत.
Chennai: Visuals of passing out parade at The Officers Training Academy pic.twitter.com/hAbQEDNHjc
— ANI (@ANI) September 9, 2017
चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत (ओटीए) झालेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनानंतर स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी त्यांचे कौतुक करण्यासाठी सासू कालिंदा घोरपडे, आई व वडील बबनराव शेडगे तसेच स्वाती यांची दोन्ही मुले कार्तिकी आणि स्वराज उपस्थित होते. त्यांना पुण्यातील देहूरोड इथं पहिली पोस्टिंग मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक शहीद झालेत. साताऱ्यातील मूळ गावी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीच त्यांची पत्नी स्वाती यांनी लष्करात जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता.