पाटणा : महाराष्ट्रात शनिवारी सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अवघ्या महाराष्ट्राला धक्का दिला. या चक्रावून टाकणाऱ्या अत्यंत गोपनीय अशा राजकीय खेळीनंतर अनेक नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीही या सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सुशील कुमार मोदी यांनी, शिवसेनेनं काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी, हे बाळासाहेबांना कधीही रुचलं नसतं. त्यामुळे, आज बाळासाहेब ठाकरे स्वर्गात खूश असतील, असं म्हटलंय.
शिवसेनेची स्थिती बिहारमधील आरजेडीप्रमाणे (RJD) झाली आहे. शिवसेनेमध्ये गुंड आणि उपद्रवी लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात, ती सहन करण्यासारखी नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
सोबतच, सुशील मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
'शरद पवार यांना नितिश कुमारांप्रमाणे माहीत होतं की, भाजप काँग्रेसहून अधिक विश्वसनीय आहे. शिवसेना आरजेडीप्रमाणे आहे. शिवसेना किंवा आरजेडीसारख्या पक्षांपसोबत काम करणं कठिण असल्याचं' ट्विट त्यांनी केलं आहे.
Congratulations @Dev_Fadnavis .Sharad Pawar like Nitish Kumar knew that BJP is more reliable then Congress.Shiv Sena was like RJD.Very difficult to work with party like SSor RJD full of lumpens.
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 23, 2019
Waiting for Sanjay Raut SS Chanakya ‘s tweet?
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 23, 2019
महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना आज सकाळी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत आपल्याला याबद्दल सकाळीच समजल्याचं, सांगितलं. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची फसवणूक झाल्याचं सांगत 'सरकार आम्हीच बनवणार' असा दावा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केला.