अयोध्या खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. 

Updated: Nov 9, 2019, 06:59 AM IST
अयोध्या खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल   title=

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा निकाल लागणार आहे. शनिवारी न्यायालयाला सुट्टी असतानादेखील हा निकाल देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून अयोध्येत ४ हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. तसंच उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसंच उत्तर प्रदेशच्या सगळ्या शाळा आणि कॉलेजना ९ ते ११ तारखेपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. ड्रोन कॅमेराने नजर ठेवण्यात येणार आहे, तसंच सोशल मीडियासंदर्भात ऍडवायजरी लागू करण्यात आली आहे.  

या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना सरन्यायाधीशांनी बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं.

महाराष्ट्रातही पोलीस महासंचालकांनी उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली गेली. १९९३ मधल्या दंगलीत सहभाग असलेल्या सर्वांची एफ आय आर नोंदी तपासल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता, सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या बैठकीनंतर पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणं, माहिती आणि व्हिडिओंवर बारिक लक्ष ठेवलं जाणार आहे.

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलं आहे. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितलं आहे. गरज असेल तर संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. गेल्या ४० दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. १६ ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आला. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्यामुळे १८ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारणार आहेत.

दरम्यान अयोध्या प्रकरणावर कोणत्याही मंत्र्याने काहीही विधान करु नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे.

देशातील विविध मुस्लीम तसेच हिंदू संघटनांकडून सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो येईल त्याचं स्वागत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठीकठिकाणी बैठका घेऊन संघटनांच्या प्रमुखांना शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देखील सर्वोच्च न्यायालयाचा जो ही निर्णय येईल त्याचं खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहन केलं होतं.