नवी दिल्ली - बसपच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. मायावती मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशात उभारण्यात आलेले त्यांचे पुतळे, विविध स्मारके आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीच्या प्रतिमा यावर करण्यात आलेला खर्च तातडीने परत करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जनतेच्या पैशातून मायावती यांनी हा सर्व खर्च केला होता. तो आता त्यांना स्वतःच्या किंवा पक्षाच्या निधीतून परत करावा लागणार आहे. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा आदेश दिला. या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही.
प्राथमिकपणे मायावती यांनी पुतळ्यांच्या उभारणीसाठी सरकारी तिजोरीतून जो काही खर्च केला तो त्यांनी व्यक्तिगतपणे परत केला पाहिजे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी पुतळे उभारण्याचा मायावती यांच्या निर्णयावर पहिल्यापासून टीका करण्यात येत होती. सरकारी तिजोरीतून अशा पद्धतीने स्वतःची प्रसिद्धी करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हा सर्व खर्च परत करण्याचे आदेश दिल्यामुळे मायावती अडचणीत सापडल्या आहेत.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वखालील खंडपीठापुढे या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. या पुतळ्यांच्या उभारणीसाठी करण्यात आलेला खर्च मायावती यांना भरून द्यावा, असे आम्हाला वाटते, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होईल. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही विरोधकांकडून वापरला जाण्याची शक्यता आहे.