Success Story : नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या इराद्याने एक तरुणी व्यवसाय क्षेत्राता उतरली. पण तीने जो व्यवसाय निवडला त्याची सुरुवातीला सर्वांनीच खिल्ली उडवली. इतकंच काय तर तिच्या आईनेही या कामाला विरोध केला. त्याच व्यवसायात या तरुणीने तब्बल 1300 कोटींची कंपनी उभी केली. 2020 मध्ये या तरुणीने रिलायन्स रिटेलला (Reliance Retail) ही कंपनी विकली. यशाची ही कहाणी आहे रिचा कर (Richa Kar) नावाच्या तरुणीची.
मुली दुकानात अंतर्वस्त्र खरेदी करायाला गेल्यावर अनेक वेळा पुरुष दुकानदार असल्याने मुलींना लाज वाटते. हीच समस्या रिचा करनेही अनुभवला होता. महिलांच्या या समस्येवर तोडगा काढण्याचा निश्चय रिचाने केला आणि यातूनच सुरु केली ऑनलाईन साईट झिवामे (Zivame). पण हा व्यवसाय सुरु करताना तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. इतकंच काय तर तिला कुटुंबातूनही बराच विरोध झाला. आपल्या मुलगी काय व्यवसाय करते हे चारचौघात सांगायला तिच्या आईला लाज वाटायची.
ज्यावेळी रिचाने अंतर्वस्त्र व्यवसायाची आयडिया आपल्या कुटुंबियांना सांगितली त्यावेळी सर्वांनी तिची खिल्ली उडवली. मित्रांनीही तिच्या व्यवसायावर जोक केले. रिचाची आई तर मुलीला हा व्यवसाय करायाल परवानगी देण्यास तयारच नव्हती. आपली मुलगी ब्रा-पँटी विकते हे आपल्या मैत्रिणींना कसं सांगू असा प्रश्न तिला पडला. पण रिचाने माघार घेतली नाही. अखेर रिचाच्या जिद्दीपुढे आईने तिला साथ देण्याचं ठरवलं. मोठ्या पगाराची नोकरी सोडत रिचा आणि तिच्या आईने व्यवसायाला सुरुवात केली.
कोण आहे रिचा कर?
रिचाचा जन्म जमशेदपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1980 मध्ये झाला. तिने बिट्स पिलानी इथून आपलं वैद्यकिय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ती बंगळुरुमधल्या एका कंपनीत नोकरीला लागली. याच दरम्यान तिला मुलींच्या अंतर्वस्त्र खरेदी करतानाच्या समस्येची जाणीव झाली. त्याचेवळी तीने अंतर्वस्त्र विक्रीचा व्यवसाय उभारण्याचा निश्चय केला. यासाठी तीने नोकरीलाही अलिवदा केलं.
मित्रांकडून पैसे घेतले उधार
रिचाने व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला, पण यासाठी लागणारा पैसा मात्र तिच्याकडे नव्हता. यासाठी तीने कुटुंबियांकडून आणि मित्रांकडून पैसे उधार घेतले. आपली संपूर्ण बचत तीने व्यवसायात गुंतवली. सर्व मिळून तिने जवळपास 35 लाख रुपये जमा केले आणि व्यवसायाला सुरुवात केली. 2011 मध्ये तीने Zivame नावाने लॉन्जरी व्यवसाय सुरु केला. महिलांना घरबसल्या कोणतीही लाज न बाळगता आपल्याला आवडती अंतर्वस्त्र खरेदी करता येऊ लागली.
1300 कोटींची व्यवसाय
सुरुवातीला या व्यवसायात म्हणावी तशी वाढ होताना दिसत नव्हती. पण ज्यावेळी इंटरनेट आणि तंत्रज्ञान प्रगत झालं, तसंच ऑनलाईन मार्केटबद्दल लोकांना माहिती होऊ लागली तसं Zivame चा व्यवसाय वाढू लागला. महिलांना या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 5 हजाराहून अधिक अंतर्वस्त्र आणि 50 पेक्षा जास्त ब्रांडची अंतर्वस्त्र उपलब्ध करुन देण्यात आली. या साईटला महिलांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला. 2014 मध्ये रिचा करचं नाव Fortune India च्या 'Under 40' यादीत समाविष्ठ करण्यात आलं होतं.