पणजी: गोव्यातील भटक्या गायींनी मांसाहारी अन्नाची चटक लागल्याची आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे आता या गायी शाकाहारी पदार्थ आणि चारा खायलाही तयार नाहीत. अखेर गोवा सरकारने या गायींना उपचारासाठी गोशाळेत दाखल केले आहे. याठिकाणी गायींना पुन्हा शाकाहाराकडे वळवण्यासाठी पशुवैद्यकांकडून उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली. ते शनिवारी आरपोरा गावातील कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मायकल लोबो यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गोव्यातील कलंगुट आणि कँडोलिम परिसरातून ७६ गायींना गोशाळेत नेण्यात आले आहे. या सर्व गायींना मांसाहाराची सवय लागली आहे. त्यामुळे अनेकजण चक्रावले आहेत. कलंगुट आणि कँडोलिम बीचच्या परिसरातील रेस्टाँरंटसमध्ये चिकन आणि तळलेले मासे मोठ्याप्रमाणावर सेवन केले जातात. या रेस्टाँरंटसकडून उरलेले पदार्थ कचऱ्यात टाकून देण्यात येतात.
भटक्या गायी हेच पदार्थ खातात. गायींना आता या सगळ्याची इतकी सवय लागली आहे की, आता त्या चाराही खायला तयार नाहीत. त्यांना माणसांसारखी सवय लागली आहे. गोशाळेत नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चणे आणि पशुखाद्य दिले. मात्र, गायी या खाण्याला तोंड लावण्यासही तयार नाहीत. या गायी पूर्वी शाकाहारीच होत्या. परंतु, गोशाळेत आणल्यानंत त्या शाकाहारी पदार्थांचा वास घेऊन त्याकडे पाठ फिरवत असल्याचे लोबो यांनी सांगितले.
त्यामुळे आता या गायींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पशुवैद्यकांकडून त्यांना औषधे दिली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत गायी पुन्हा शाकाहारी पदार्थ खायला लागतील, असेही लोबो यांनी म्हटले.
या गाई रस्त्यांवर फिरत असल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या गायींना गोशाळेत हलविण्यात आले. मायेम येथील गोमांतक गोसेवक महासंग ट्रस्टच्या गोशाळेत या गायींची व्यवस्था करण्यात आली आहे.