लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांची महाआघाडी करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना खिंडार पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी राज्यातील जागा वाटपाची बोलणी पूर्ण केली असून, पुढील महिन्यात मायावती यांच्या वाढदिवशी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. झी मीडियाला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
सप आणि बसप या दोन्ही पक्षांनी जागा वाटपाची चर्चा पूर्ण केली असून, या आघाडीमध्ये काँग्रेस नसेल, अशी माहिती मिळाली आहे. अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल मात्र या आघाडीमध्ये असेल. त्यांच्यासाठी तीन जागा सोडण्यात येईल, असे समजते. दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशात समसमान जागांवर उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाआघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. त्यासाठी सर्व विरोधकांशी सध्या चर्चा करण्यात येत आहे. काही वेळापूर्वी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रमुख राज बब्बर यांनी राज्यात महाआघाडी होईल, याबद्दल आजही आपण सकारात्मक असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणूक सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढवावी, अशी उत्तर प्रदेशमधील लोकांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. देशात दोन विचारधारा कार्यरत आहेत. त्यापैकी एक गांधीजींची आहे. ज्यावर काँग्रेस पक्ष चालत असून, दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. ज्यावर भाजप राज्य करत आहे, असे त्यांनी सांगितले.
महाआघाडीच्या प्रयत्नांना सप आणि बसप या दोन्ही पक्षांनी विरोध दर्शविल्याचे सातत्याने दिसते आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला जाण्याची मायावती यांनी टाळले होते. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला भाजपसोबत काँग्रेसचे आधीचे सरकारही कारणीभूत असल्याची टीकाही मायावती यांनी केली होती. अर्थात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणाही मायावती यांनी केली होती.
राहुल गांधी हे महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, याला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विरोध केला होता. त्यांनीही तीन राज्यांतील शपथविधी सोहळ्याला जाणे टाळले होते.